साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा खीर, साबुदाणा थालीपीठ इत्यादि पदार्थ खाण्यासाठी आपल्याला उपवास या निमित्ताची गरज नसते. शिवाय ‘उपवास’ चा आणि साबुदाण्याचा अर्थार्थी संबंध देखील नसतो.
जिभेला अत्यंत तृप्त करणारा पदार्थ – साबुदाणा !
पण जे काही जिभेला तृप्त करते ते शरीरासाठी उत्तम असतेच असे नाही.
पचायला अत्यंत जड, शरीरात ‘जडपणा’ निर्माण करणाऱ्या, कफं आणि पित्ताची आम्लता वाढवणाऱ्या अशा साबुदाण्याला दही टाकून खाणे म्हणजे शरीराला अधिकाधिक सक्त मजुरीची शिक्षा करण्यासारखे आहे.
ऋतु, वय, पचनशक्ती अशा कुठल्याही गोष्टींचा विचार न करता नियमित खाल्ले जाणारे असे पदार्थ अनेक आजारपणांची ‘समजून न येणारी नांदी’ असतात.
उपवासाची मूळ संकल्पना कधीच ‘लोप’ पावली आहे. चतुर्थी, एकादशी, नवरात्री, अशा नियमित उपवसांच्या जोडीला विविध देवांचे विविध वारांचे उपवास. उपवास करणार्या व्यक्तिसोबत घरातल्या प्रत्येकाचा ‘साबुदाण्याचा फराळ’’! बहुतांशी व्रत वैकल्ये पावसाळ्याच्या दरम्यान (चातुर्मास) येतात आणि त्या दरम्यान साबुदाणा आहारात असेल तर आम्लपित्त उत्तमरीत्या वाढीस लागते.
अशक्तपणात ‘साबूदाण्याची खीर’ दिली जाते कारण साबुदाणा साखरेचा म्हणजेच ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे.
पण वारंवार खाल्ला जाणारा साबुदाणा ‘रकतातली न पचलेली साखर’ वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो.
लहान मुलांचा अत्यंत आवडणारा पदार्थ असतो साबुदाणा! पण त्यांचे कफाचे वय लक्षात घेता त्यांच्या आहारात जर वरचेवर साबुदाणा असेल तर त्यांच्या शरीरात कफाचे प्रमाण अजाणता वाढवले जात आहे.
साबुदाण्याचे सगळेच पदार्थ चविष्ट असतात पण जिभेला तृप्त करताना लक्षात ठेवा की,
पावसाळ्यात,
ढगाळ हवामान असताना,
भूक नसताना,
कफ आणि आम्लपित्त असताना
दही टाकून,
रात्री,
साबुदाणा खाणे टाळा, स्वास्थ्य राखा!
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
976499557