लेले सरांशी गप्पा मारणे हा खूप भारी अनुभव असतो. सर खगोल शास्त्राचे तज्ञ आहेत. दिसणाऱ्या न दिसणाऱ्या विश्वाच्या पसऱ्याबद्दल आमच्या अगणित शंका असतात. त्यांच्या खगोलीय दृष्टीने जेव्हा आम्ही या पसाऱ्याकडे बघतो तेव्हा खूप प्रश्नांची सहजतेने उकल होत जाते.
नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना! आदिशक्ती म्हणजे मातृत्व, संगोपन आणि नव निंर्मिती. विश्वाच्या पसाऱ्यात जिथे जिथे व्यक्त अथवा अव्यक्त चैतन्य आहे तिथे हि विश्वव्यापी शक्ती आहे.
युगानुयुगे ही तिन्ही कार्य अविरत करणार्या पृथ्वीला सर ‘आदिशक्ती’ रूपात पाहतात. तिला सतत ऊर्जा पुरवणारा ‘भास्कर’ हा जणू शिव !
‘काल निर्मिती आणि कालमापन’ या दोन गोष्टींकडे ‘शिव आणि शक्ती’च्या अनुषंगानेही बघता येते ही गोष्ट आम्हाला अगदीच नवीन होती. आपल्याला योग्य अशी भूमी, वातावरण, पाणी या बरोबरच लाभलेल्या ऋतूनी आपले आयुष्य खऱ्या अर्थाने बहरून गेले आहे. काळ समजून घेणे, त्याचे मोजमाप करणे ही आपल्या विकासातील महत्वाची पायरी होती.
दिवस आणि रात्र हे काल मापनातील हे पहिले एकक. आपण म्हणतो की सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो हा कालावधी दिवसाचा आणि पश्चिमेला मावळून पुन: पूर्वेला उगवतो हा कालावधी रात्रीचा. हा एक सौर दिवस घडून यायला सूर्य कुठेही जात नसतो, हे कार्य घडून येते पृथ्वीच्या फिरण्याने. सूर्याभोवतीच्या एका प्रदक्षिणेच्या कार्याचे फळ म्हणजे एक दिवस. हे कार्य वसुंधरेचे आणि श्रेय आदित्याला (सूर्याला)!
पुढचा दिवस – पृथ्वी २४ तासात स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करीत असतानाच सूर्य प्रदक्षिणेच्या मार्गावर १ अंशांनी पुढे सरकते, यामुळे सूर्य आयनिक वृत्तावर ( elliptic) १ अंश पुढे सरकल्याचा भास होतो. यामुळे नोंद होते पुढच्या सौर दिवसाची. हे देखील कार्य धरेचे आणि श्रेय मात्र भास्कराला.
कालमापनातील पुढचे एकक म्हणजे महिना. पृथ्वीच्या भ्रमण मार्गाचे एकूण १२ भागात विभाजन केलेले आहे. प्रत्येक भाग ३० अंशाचा असून त्यालाच आपण ‘राशी’ म्हणतो. पृथ्वी रोज १ अंश या वेगाने १ राशीभाग आक्रमिते. यामुळे सूर्य आयनिक वृत्तावरील १ रास पूर्ण करतो (zodiac). यालाच आपण सौर मास म्हणतो. पुन: कार्य ‘अवनीचे’ श्रेय ‘भानुला’.
ऋतु हा काल मापनातील अविभाज्य घटक. पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे ती सूर्याभोवती फिरताना वातावरणात आणि निसर्गात ठराविक बदल होतात, ज्याला आपण ऋतु म्हणतो. या ऋतूंचे आपल्याला खूप मोठे वरदान आहे. आपली संस्कृती याच ऋतूंच्या आधारे वाढली आणि जोपासली गेली. हे कार्य देखील ‘क्षितिचे’ आणि श्रेय मात्र ‘रवीला’.
दक्षिणायन -उत्तरायण – सूर्य प्रदक्षिणेच्या दरम्यान पृथ्वीचा अक्ष तीन ऋतूंच्या कालावधीत दक्षिण अथवा उत्तर दिशेने वाढत जातो. ( म्हणजेच तिचे कलणे दक्षिणेकडे अथवा उत्तरेकडे वाढत जाते.) पण आपल्याला सूर्य उत्तर दिशेने अथवा दक्षिण दिशेने सरकताना दिसतो. हा प्रवास कर्क वृत्त ते मकर वृत्त ( tropic of Capricorn and tropic of Cancer) या दरम्यानच राहतो. याला आपण सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणतो. हे देखील कार्य ‘रत्नगर्भेचे’ आणि श्रेय मात्र ‘अर्काला’.
३६५ ( किंवा ३६४.२५) दिवसांचा खडतर भ्रमणमार्ग पूर्ण करून मूळ जागी परत येऊन ऋतूंचे एक चक्र पूर्ण करते. या कालावधीला आपण सौर वर्ष म्हणतो. वर्ष संकल्पनेचे कार्य ‘इलेचे’ आणि श्रेय ‘मित्राला’.
वसंत संपात आणि शरद संपात (vermal equinox and autumnal equinox) –
पृथ्वीच्या वैशिष्ट्यपूर्ण भ्रमणामुळे संपात बिंदूंचे transition होते. हे वैशिष्ट्यपूर्ण भ्रमण असते तिच्या ‘डुलत डुलत’ चालण्याचे आणि हे डुलत चालणे असते ते तिच्यावर विखुरलेल्या असमान वस्तुमानामुळे! यामुळे अक्षांचे आणि संपात बिंदूंचे विचलन होते. Equinox म्हणजेच संपातावर सूर्याच्या येण्यावरून पुढची मोजणी केली जाते.
आपली पृथ्वीरूपी आदिशक्ती कुसुमाग्रजांच्या कवितेत वर्णन केल्या प्रमाणे ‘युगानुयुगे भास्करच्या कक्षेत धावत आहे’! आणि आपल्याला जीवन प्रदान करत आपले खऱ्या अर्थाने संगोपन करत आहे.
कधी कधी वाटते की सूर्याकडून येणार्या उष्णता आणि प्रकाश ऊर्जेचे योग्य नियमन करण्यासाठी तिने स्वत:च अक्ष titled करून घेतला असावा का? एखादी आई जशी मुलांसाठी तडजोडी करत असते तसेच काहीसे.
शिवाकडून ‘बीज’ मिळाल्यानंतर त्याची गर्भात जोपासना करून, ते बीज अंकुरित करून, त्याला सक्षमतेने वाढवणे, त्याला योग्य ते पोषण देणे, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वापर्यन्त त्याला जोपासणे ही सर्व कार्ये ‘शक्तीचीच’!
सृजनाच्या या सामर्थ्यामुळेच आपल्या संस्कृतीत पुरुष देवांपेक्षा काकणभर जास्त महत्व ‘शक्तीला’ दिले गेले आणि अजूनही दिले जाते. मातृसत्ताक संस्कृतीची बीजे या विचारधारेतच दिसून येतात. मानवी उत्क्रांती बरोबरच निसर्गत: उत्क्रांत झालेली आपली हि सनातन संस्कृति ! तिच्या पद्धती सगळ्या खगोलीय ज्ञानाशी जोडलेल्या आहेत त्यामुळेच ती आचंद्र सूर्य ‘अबाधित’ आहे.
अगदी वेदपूर्व काळात देखील आदिशक्तीचे महत्व लोक जाणत होते आणि म्हणूनच त्या काळी आपल्या संस्कृतीत स्त्रीयांना बरोबरीचे स्थान होते (आजही आहेच). आपण ज्यांना प्रगत समजतो अशा पाश्चात्य देशात महिलाना मतदानाचा अधिकार अगदी गेल्या दशकात मिळाला.
गार्गी, मैत्रेयी आदींनी वेदाचे अधिकार गाजवलेच, पण आदि शंकराचार्य आणि पंडित मंडन मिश्र यांच्या वादविवादाचा अंतिम निर्णय देणारी एक स्त्री होती आणि ती मंडन मिश्र यांची पत्नी होती. तिच्या ज्ञान सामर्थ्यावर दाखवलेला खूप मोठा विश्वास आहे हा.
एका खगोलशास्त्र अभ्यासकाच्या, तज्ञाच्या दृष्टीतून हे शक्तीचे रूप आपल्या पृथ्वीत बघताना खूप भरून आले. आतापर्यंत मातीला ‘आई’ संबोधले जात होते पण हा विचार पृथ्वीच्या बाबतीत कधी आला नव्हता.
विश्वाच्या या एवढ्या मोठ्या पसार्यात जिच्यामुळे आपले अस्तित्व आहे अशा वसुंधरेला, तिच्या सृजन शक्तीला त्रिवार वंदन!
शब्दांकन – वैद्य ज्योत्स्ना पेठकर
संकल्पना – श्री. रामचंद्र लेले – 9890458997