सारखं वापरुन वापरुन शरीर झिजत असतं, अन्न आणि झोप या दोन गोष्टी ही झीज भरून काढत असतात. यापैकी झोप या महत्वाच्या मुद्द्यावर स्वतंत्र लिहिणार आहे लवकरच!
आहारबद्दल मी खूपदा लिहीत असते, बोलत असते, पण आज झीज भरून काढणे या दृष्टीने बघूया. आपल्या सगळ्यांच्या स्वास्थ्याच्या संकल्पना विविध vitamins आणि minerals च्या भोवती फिरतात. म्हणजे हाडं अथवा सांधे दुखायला लागले की आधी पटकन आपल्या डोक्यात विचार येतो कॅल्शियम आणि विटामीन डीचा. यात गैर काही नाही. Calcium आणि Phosphorus हे महत्वाचे हाडातील मुख्य minerals आहेत. त्यांची झीज झाली की ते भरुन काढायलाच हवे.
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे विविध दृष्टिकोण आहेत. मॉडर्न नुसार आपण त्यात विटामीन किती, कुठले, मिनरल किती कुठले, त्यात carbs अथवा प्रोटिन किती असा विचार करू, तर आयुर्वेद ‘गुणांच्या’ भाषेत विचार करणार. म्हणजे पचायला जड आहे, हलके आहे, शरीर स्निग्ध करणार कि कोरडे करणार, शरीरात उष्णता निर्माण करणार की उष्णता कमी करणार?
कुठल्याही गोष्टीच्या आपल्याला अशा दोन्ही बाजू माहिती असल्या की कुठला पदार्थ कुठल्या ऋतुत खावा म्हणजे त्याचे हवे ते फायदे मिळतील असे ठरवायला सोपे जाते.
आयुर्वेदानुसार हाडांचे सांध्यांचे स्वास्थ्य जर कुठल्या एका गोष्टीवर अवलंबून असेल तर ती आहे – स्निग्धता ! तेल, तूप, लोणी, दूध, दही, श्रीखंड, खोबरे, ताज्या नारळाचे दूध इत्यादि गोष्टीतून जाणारी स्निग्धता आणि विशेषत: हिवाळ्यात खाल्ले जाणारे डिंक- खारीक – खोबरे यांच्या पोषक गुणांनी भरलेले लाडू आपली हाडे आणि सांधे खऱ्या अर्थाने मजबूत ठेवतात
हाडे आतून पोकळ झाली आहेत, व्हायला लागली आहेत किंवा बोन density कमी झाली आहे, osteoporosis झाला आहे, अशी वाक्ये तुम्ही खूपदा ऐकली असतील. ते म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, हाडांच्या आतली स्ंनिग्धता ज्याला मज्जा अथवा bone marrow म्हणतात ते कमी झालेले असते.
कमी मिळणारी झोप, सततची धावपळ, शिळे अन्न खाणे, सतत असलेला मानसिक तणाव, शरीराची अवस्था आणि गरज याचा अभ्यास न करता केलेला व्यायाम शरीराची झीज अतोनात वाढवते. आपण घेत असलेला आहार आणि शरीराची झीज यांचा काही ताळमेळ बसत नाही कारण आहार सुद्धा कोरडा कोरडा आणि पोषण न करणारा असतो.
वारेमाप fertilizers आणि pesticides वापरुन, जनुकीय बदल करून काढलेले पीक पोषण करण्यास मुळातच असमर्थ असते आणि त्यात आपण सतत या न त्या निमित्ताने हॉटेलचे अन्न खात असतो ज्यात कुठलेही पोषण मूल्य नसते.
झोपेपासून अन्नापर्यंतची विविध कारणे शरीराचे स्वास्थ्य घालवत राहतात आणि मग कालांतराने हाडं पोकळ होत जातात, हाडांना चिकटलेले स्नायू कोरडे पडत जातात आणि साध्या साध्या हालचाली कठीण होऊ लागतात, सांध्यातील वंगण कमी होत जाते, सांधे कुरकुर करू लागतात, केसांचे गळणे वाढते, त्यांची चमक कमी होते ( आयुर्वेदानुसार हाडांच्या स्वास्थ्यवर केसांचे स्वास्थ्य अवलंबून असते.)
या तक्रारींवर आपण आधी विचार करतो विटामीन डी आणि कॅल्शियमचा! अर्थात तो मुळीच चुकीचा विचार नाही. सप्लिमेंट्सच्या कुबड्या गरज भासली तर घ्यायल्या काही हरकत नाही पण त्यासोबतच झीज भरून काढण्यासाठी आहार स्निग्ध असणे, अती झिजवणारी जीवनशैली बदलणे अत्यंत महत्वाचे आहे.
शरीराचा भार समर्थपणे पेलणारी हाडे आपल्या शरीराचाच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा भक्कम आधार आहेत, त्यांच्या स्वास्थ्याचा सर्वांगीण विचार करून हा आधार भरभक्कम करूया!
स्वस्थ अस्थि भव
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७