कुठलीही नवीन गोष्ट जाणून घेण्याची इच्छा होणे हे ‘उपजत’ – nature असते. काय काय नवीन गोष्टी जाणून घेता येईल हे मुलांसमोर मांडणे ही ‘जडण -घडण’ – nurture असते.
आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा ही अशीच एक अत्यंत महत्वाची गोष्ट! याचे विविध संदर्भ ऐकत ऐकत मुलं लहानाची मोठी होत असतात. बलिदान दिलेल्यांपैकी जी नावे अधोरेखित झाली ती मुलांच्या कानावर नकळत पडत राहतात आणि इतिहास बिंबवला जात असतो.
परकीयांची राजवट गेली, आपण आपला कारभार आपल्या पद्धतीने करण्यास पात्र झालो. इथून पुढे सुरू झाला प्रवास सक्षम होण्याचा!
कुठेलही राष्ट्र म्हणजे जमिनीचा फक्त तुकडा नसतो. तो बनतो, घडतो, ओळखला जातो, तिथल्या माणसांनी. या जनसमुदायाला शिक्षण, तंत्रज्ञान, उत्पन्नाचे साधन, अन्न -वस्त्र निवार्या सारख्या वैयक्तिक ते सामाजिक अशा सगळ्याच गोष्टी उपलब्ध करून देणे, यासाठी आपण सक्षम होणे अत्यंत गरजेचे होते. स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बहुमोल योगदान दिले होते, आता वेळ होती एका वेगळ्या योगदनाची!
सामन्यांमधील काही असामान्यांनी कठोर परिश्रम, संशोधन, चिकाटी, जिद्द, या बळांवर हे शिवधनुष्य लिलया पेलले. या भक्कम पाठकण्यामुळे आज आपले राष्ट्र इतर अनेक राष्ट्रांना मदत पुरवण्याइतपत सक्षम झाले आहे.
देशाला सक्षम करणार्या या मंडळींची ओळख करून देणे हा मुलांच्या ‘जडण – घडणीचा’ अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यांच्या रोजच्या वापरातल्या वस्तु, खाण्यातले पदार्थ, ते फिरतात त्या गाड्या, ते घालतात ते कपडे, पावलो पावली वापरली जाणारी technology याकडे बघण्याची दृष्टी येणे हे जीवनाभिमुख शिक्षणाचा भाग आहे.
ज्यांनी कधी गुलामगिरी अनुभवली नाही ते स्वातंत्र्य लढ्याशी उत्कट भावनेने कनेक्ट होणे थोडे अवघड असते, पण ज्या ज्या गोष्टींनी, रिसोर्सेसनी आयुष्य सोपे केले आहे, उत्कृष्ट असे infrastructure उपभोगू शकतोय त्यांची सुरुवात कशी आणि कुठे झाली याच्याशी एक उपभोक्ता म्हणून कनेक्ट होणे त्यांना सोपे जाते.
यंदाचा 76 वा स्वातंत्र्य दिवस देशाला बळकट करणार्यांना समर्पित असावा का हा विचार मुलांसमोर मांडला. त्यांना ती कल्पना आवडली आणि तिथून सुरू झाला एक प्रवास – economy म्हणजे काय?, GDP म्हणजे काय? , FMGC म्हणजे काय? रोजगार कसे उपलब्ध होतात? Foreign Direct Investment कशी येते?, आपण काय import करतो काय export करतो? टॅक्स का घेतला जातो? असे अनेक प्रश्न पडत गेले आणि त्यांची उकल करता करता एकेका उद्योग समुहाचा, एकेका उद्योगपतींचा प्रवास अनुभवत ते थक्क होत गेले.
आपण सिल्क एक्सपोर्ट करण्यात जगात तिसर्या स्थानावर आहोत हे सांगताना एकीचा चेहेरा अत्यानंदाने फुलला होता. PNG एक्सप्लोर करताना त्यांची सुरुवात सांगलीतल्या एका छोट्या कट्ट्यापासून झाली आहे यावर एकीचा विश्वास बसेना कारण तिनं आत्ताची चकाचक शोरूम पहिली आहे. Haldiram हे एक nickname आज इतका मोठा ब्रॅंड झालाय हे अनुभवून एकीचा आ वासला गेला. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही इंडस्ट्रीने सारे जग कसे एका क्लिकच्या अंतरावर आणून ठेवले आहे आणि त्यातील प्रगतीमुळे आपल्याला FDI कशी मिळत आहे हे सांगताना एकाचा चेहेरा आनंदाने अभिमानाने फुलला. या सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये ‘ISRO’ देखील आपल्या राष्ट्राच्या अर्थव्यस्थेचा किती मजबूत कणा आहे हे एकाने आम्हालाच अतीतटीने पटवून दिले. चहापासून मीठापर्यन्त, शिक्षणापासूनतंत्र ज्ञानापर्यंत, देशाच्या संरक्षणापासून समाजसेवे पर्यंत कार्यरत असलेला इस्पात सारखाच मजबूत टाटा उद्योगसमूह जाणून घेताना एकाने लाडिक त्राग्याने विचारले , ‘ अरे हे काय बनवत नाहीत ते सांगा’!
प्रत्येक स्टोरी त्यांना अभिमानाची भावना देत गेलीच पण त्याबरोबरच कष्टाचे, शिस्तीचे ,शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत गेली. ‘आपण’ काय आहोत हे जसे सांस्कृतिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या माहीत हवे तसेच ‘औद्योगिकदृष्ट्या’ देखील.
कष्ट, शिस्त आणि शिक्षण यांच्याकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी हा जडण -घडणीचा अतिशय महत्वाचा टप्पा आहे त्यामुळेच राष्ट्राला सक्षम बनवणार्या उद्योगाचा – तंत्रज्ञानाचा वारसा पुढे चालू राहणार आहे.
#natureandnurture
जय हिंद
वैद्य ज्योत्स्ना पेठकर