“ अफगाणिस्तान आणि मध्य आशियातून भारतात उतरण्यासाठी खैबरखिंड हा राजमार्ग होता. या मार्गातून प्रवासी, व्यापारी, इतिहासकार, विद्यार्थी तर आलेच, आणि यवन, कुशाण, हुण, गझनी, घुरी, तैमूर, मुघल, अब्दाली हे आक्रमक देखील आले”.
आम्ही ‘दीपालीताई पाटवदकरांचे’ देशविदेशातील ‘भारतीय संस्कृतीची स्वस्तीचिन्हे’ हे पुस्तक वाचत होतो. खैबर खिंडीच्या उल्लेखाने जणू अनेक जखमांवरची खपली निघाली. नुकत्याच होऊन गेलेल्या संक्रांतीला वाचलेला पानीपताचा इतिहास अजून मनात ताजा होता. मुलांकडून आपसूकच प्रश्न आला, “ आपण का नाही कधी सैन्य पाठवले याच खिंडीतून?”
“ आपण पाठवले न पण सैन्य नाही , आपण या खिंडीतून पाठवले अंकगणित, दशमान पद्धत, विज्ञान , वैद्यकीय विज्ञान, कथा, साहित्य आणि बुद्धाचा शांती संदेश” ! या उत्तराने मुलांच्या चेहेर्यावरची किंचित विषदाची, रागाची छटा जाऊन तिथे आता अभिमान दिसू लागला.
हीच आपली ‘ संस्कृती’!
कित्येक आक्रमण कर्त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तरीही आज हजारो वर्षानंतरही पाय घट्ट रोवून उभी आहे आपल्यात खोलवर रूजलेली आहे.
विविध भाषांतून समृद्ध साहित्य संस्कृती, खगोलीय बदलांचे ज्ञान जपणार्या विविध सणांची आणि विशिष्ट पद्धतीने ते साजरा करण्याची सणांची संस्कृती, मंदिर असो अथवा महल त्यांचे वैशिष्ट्य जपणारी स्थापत्य संस्कृती, प्रसंग -वय – भौगोलिक परिस्थिती अनुरूप बदलणारी पोशाख संस्कृती, मनोरंजनाच्या खूप पलीकडे असलेली गायन -वादन संस्कृती, हातांचा सृजनशील उपयोग करत बहरणारी हस्तकलेची संस्कृती आणि या सर्वांसोबतच ‘जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी’ आपली संस्कृती आपले वैयक्तिक आणि सामाजिक भान – विवेक जागृत ठेवत जगणे समृद्ध करत असते.
ही संस्कृती जिथे जिथे बहराला आली तिथे तिथे आपल्या ‘मांगल्याच्याच खुणा’ फक्त मागे ठेवून गेली. आजही भग्नावस्थेत या खुणा आपला इतिहास सांगत उभ्या आहेत.
आपली श्रद्धास्थाने नष्ट केली की आपली संस्कृती संपेल आपली विचारधारा बदलेल या भ्रामक कल्पनेतून अनेक अद्वितीय मंदिरांचा विद्ध्वंस केला गेला…..त्यावर स्वत:ची ओळख तयार करण्याचे असफल प्रयत्न झाले …… पण पिढ्यांपिढ्या आमच्या जनुकात खोलवर रुजललेली संस्कृती उखडून टाकणे सोपे नाही.
अनेक पिढ्या यासाठी लढल्या आहेत, आजही लढत आहेत. असाच अनेको वर्ष चाललेला लढा जेव्हा यशस्वी होतो, तेव्हा तो खूप खास असतो!
आपल्या संस्कृतीची श्रद्धास्थाने, आपली मंगलचिन्हे पुन्हा मूर्त रूपात घडताना बघण्याचे सौभाग्य लाभले तो मंगल दिन,
22 जानेवारी, या मंगल प्रभाती पारंपरिक पोषाखात आणि दागिन्यात सजलेली मुले रांगोळ्यांनी, फुलांनी गोकुळ सुशोभित करत होती, कर्नाटक शैलीतील प्रभू रामचंद्रांच्या भजनाच्या सुरांनी वातावरण भरून गेले होते, चांदीच्या ताटातून पेढ्यांचा प्रसाद सर्वांना वाटून आनंद द्विगुणित होत होता……
‘संगीत गायन दे रे राम – अलाप गोडी दे रे राम
विद्या वैभव दे रे राम – उदासिनता दे रे राम
नृत्य कला मज दे रे राम – शब्द मनोहर दे रे राम’
रघुनायकाकडे मागणे मागितले गेले……..
अनेको संस्कृती उदयास आल्या आणि कालौघात नष्ट झाल्या, पण अनेको प्रयत्नांनी देखील भारतीय -हिंदू संस्कृती आजही आहे, उद्याही राहील! विविध कला आणि ज्ञान यांनी बहरलेली जगण्याची इतकी समृद्ध पद्धती शाश्वत असणारच !
याची ओळख भावी पिढीला डोळसपणे करून देणे अत्यंत गरजेचे आहे . अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अवकाशाला गवसणी घालताना संस्कृतीच्या मुळांशी घट्ट असतील तरच विवेक जागृत राहील आणि छान बहरतील!
शुभं भवतु
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
9764995517