दिवाळी म्हणजे काय, या सणाला प्रकाशाचे महत्व का?, त्याच अमावास्येला का ती साजरा करायची? हे खगोलशास्त्राशी कसे संबंधित आहे, इतके सगळे फराळाचे पदार्थ तेव्हाच का खायचे? दिवाळीच्या शास्त्रीय, कलात्मक, संस्कृतिक अशा सगळ्याच पैलूंवर आम्ही गोकुळ मध्ये चर्चा करत होतो. निमित्त होते connecting to the root activity चे, डोळसपणे जाणून घेण्याचे!
शुभ दीपावली ऐवजी ‘Happy and Prosperous Diwali’ या वाक्यांची सवय असलेल्या मुलांना ‘prosperous’ म्हणजे नेमके काय असा अगदी योग्य तो प्रश्न पडला. समृद्धी म्हणजे नेमके काय? ही विपुलता कशा कशात असावी, कशा कशात असते, याची व्यापकता समजावून घेताना त्यांनी आजवर अभ्यासलेला विविधतेने नटलेला ‘भारत’ त्यांना दिसू लागला आणि त्यांना समृद्धीचा अर्थ चटकन कळला.
दिवाळी पहाटच्या निमित्ताने मी हाच ‘समृद्ध भारत’ एका मंचावर अनुभवला आणि समृद्धतेचा ‘भगव्या वाटेवरचा’ एक अतिशय विलक्षण पैलू देखील. अद्वैताच्या’ रूपाने एकाच मंचवार विविध राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण वाद्ये, तेथील संगीत, त्याच भाषेत रचलेली भक्तिरसातील कवने, एकाच उगमाकडे प्रवास करणार्या वेगवेगळ्या सात यात्री यांची अनुभूती खरच ‘शब्दातीत’ आहे.
अरुणा ताई ढेरेंच ‘भगव्या वाटा’ मी काही दिवसांपूर्वीच वाचले होते, पण ते माझ्या ‘जाणिवेत’ आले ‘अद्वैताच्या’ मांडणीतून.
आपल्या मुक्ताई आणि जनी आहेतच पण कश्मीरची लल्लेश्वरी, गुजराथची गंगावती, राजस्थानची मीरा, कर्नाटकाची महासती, तामिळनाडूची अंडाल अशा विविध प्रांतातील ‘विरागिनी’ देखील ‘भगव्या वाटेवरच्या’ यात्री आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध ‘उगमाकडे’ जाणारी त्यांची यात्रा एकच आहे. या सगळ्यांचेच जीवन संघर्षाने भरलेले आहे. कधी स्वकीयांशी, कधी समाजाशी तर कधी स्वत:शीच असलेल्या कडव्या संघर्षाने त्यांना ‘भक्तीच्या वाटेवर’ नेले. मनातील अतीव दु:खानी आर्ततेने त्या परमउर्जेला साद घातली आणि जन्माला आली अनेक कवने, अनेक अभंग, अनेक विराण्या……
पण गम्मत अशी की त्यांना स्फुरलेल्या रचनेत कुठेही ‘संघर्षाची कटुता, वेदनांचे प्रदर्शन’ नाही. आहे ती फक्त त्या परमतत्वाची ओढ आणि त्याच्या प्राप्तीनंतर मिळणारा निखळ आनंद! जो आपल्याला अत्यंत प्रेरक आहे. छोट्या छोट्या संघर्षांनी जीवन संपवू पाहणार्यांसाठी तर निश्चितच संजीवनी आहे.
शब्दातून प्रकट झालेले आत्मज्ञान जेव्हा सुरांचा साज चढवून आपल्या समोर येते तेव्हा ते अधिकच भिडते. अद्वैताचे संहिताकार वैभवदादा त्यांच्या अनुभूतीतून या सात स्त्री संतांचा प्रवास उलगडत जातात.
देवकीताईंनी त्यांच्या स्वराला स्वत:च विविध शैलीतल्या संगीतात बांधले आहे. त्यांना कर्नाटक शैलीत आणि गुजराथी लोकसंगीत गाताना ऐकणे ही खूप मोठी पर्वणी आहे. रचनांची सुरुवात त्या त्या भाषेत केल्याने ‘अद्वैता’ एक वेगळीच ऊंची गाठतो.
मंचावर ढोलकी, पखवाज, तबला, बासरी, गिटार, वॉयलिन, राबाब, मोरचंग किंवा मुखरशंकू, टाळ, अशी विविध प्रांतातील वाद्ये बहार आणतात. स्वर तेच पण किती विविधतेने उमटत जातात, केवढी ही समृद्धता!
‘फागुन के दिन चार’ मीरेच्या या शब्दांना मी आधीही वेगवेगळ्या सुरात ऐकले आहे, पण मीरेचे हे अध्यात्म देवकी ताईंच्या स्वररचनेत ऐकणे हा ‘अद्वैताचा कळस बिन्दु’ आहे. असे वाटते की कृष्णाच्या लाडक्या मीरेच्या बोलाना स्वर देताना प्रत्यक्ष त्यानेच ताईंकडून हे करवून घेतले असावे.
“बिन करताल पखावज बाजै अणहदकी झणकार रे।
बिन सुर राग छतीसूं गावै रोम रोम रणकार रे॥´”
रोम रोम त्या अनहात नादाने भरून ओसंडून वाहण्यासाठी मीरेला वाद्यांची गरज नाही. कृष्णाच्या प्रेमात – भक्तीत पुर्णपणे बुडालेल्या मीरेला ते सहज साध्य आहे. तुम्ही आम्ही सामान्य माणसे, समर्पणाच्या भगव्या वाटेवर अजून आपला प्रवास सुरू व्हायचा आहे. अशा वेळी ‘अद्वैता’ सारखा ‘भक्ती योग’ आपल्याला या वाटेवर जाण्याची ओढ निर्माण करतो.
देहाकडून देवाकडे जातांनाची भगवी वाट किती समृद्ध आहे याची पदोपदी जाणीव करून देतो.
शुभास्ते पन्थान: सन्तु।
वैद्या ज्योत्स्ना पेठकर
9764995517