सर्दीसाठी श्रीखंड?
वैद्य मॅडम बऱ्या आहेत न?
रोज ताजे श्रीखंड खायला सांगितल्यावर रुग्णाच्या चेहेऱ्यावर मला हे दोन्ही प्रश्न स्पष्ट दिसत होते. पण ते तसेच अनुत्तरित ठेवले कारण पुढच्या दोन दिवसात त्याना आपोआप त्याची प्रचिती आली.
निदान आणि चिकित्सा दोन्ही बाबतीत आयुर्वेद शास्त्र ‘गुणांचा’ विचार प्राधान्याने करते.
चिकित्सा करताना औषधांसोबत अन्नाचा देखील औषध म्हणून केलेला विचार रुग्णाला पटकन बरे करत असतो.
शिशिर ऋतुत निसर्गात आणि शरीरात ‘रुक्ष’गुण वाढलेला असतो. पानं कोरडी होऊन झाडापासून सहज विलग होत पानगळती सुरू होते आणि आपली फक्त त्वचाच नाही यात सगळे शरीर आतून कोरडे कोरडे होत जाते.
यातच सुरू झालेल्या उत्तरायणामुळे उन वाढत जाते आणि शरीरात साचलेला कफ पाझरु लागतो आणि मग नाक वाहू लागते, खोकला सुरू होतो. इतर ऋतुत होणार्या सर्दीपेक्षा वसंताच्या आगमनाला सुरू होणारी सर्दी वेगळी असते. या ऋतुत येणारा खोकला देखील वेगळा असतो. सहजतेने कफ सुटत नाही कारण तो रुक्षतेमुळे फुफ्फुसातील वायुकोषाना (alveoli) चिकटून बसतो. रुग्ण खोकून खोकून बेजार होतो. हाच घट्ट चिकटून बसलेला कफ जास्त दिवस टिकून पुढे न्यूमोनियाला कारणीभूत होतो.
औषधांच्या जोडीला, पचायला हलके अन्न आणि रुक्षतेवर उष्णतेवर उत्तम काम करणारे घरी बनवलेले ताजे श्रीखंड अमृतासमान काम करते.
त्याचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात –
“रसाला बृहणी वृष्या स्ंनिग्धा बल्या रुचिप्रदा”
श्रीखंड गुणांनी स्निग्ध आहे , थंड आहे एव्हढेच नाही तर थकवा घालवणारे देखील आहे.
घरी लावलेल्या दहयाला मऊ सूती कापडात बांधून टांगून ठेवावे, त्यातले अनावश्यक पाणी निघून जाऊ द्यावे. हाती आलेल्या ताज्या घट्ट मऊ चक्क्यात प्रमाणात खडीसाखर घालून मनाला प्रसन्न ताजेतवाना करणारा गोडवा वाढवावा. वेलचीचे हिरवेगार आवरण काढून आतल्या दाण्यांचे चूर्ण श्रीखंडात घालून श्रीखंडाचा फक्त स्वादच नाही तर थंडावा देखील वाढवावा.
असे ताजे स्निग्ध मधुर श्रीखंड प्रमाणात खाल्ले असता, शरीरातली उष्णता कमी होते, रुक्षता / कोरडेपणा कमी होऊन घट्ट चिकटलेला कफ अलगद सुटतो, पिकतो आणि सहजतेने बाहेर पडतो. नाक, घसा आणि इतर सायनसेस मध्ये अडकून बसलेल्या कफाने वाढलेली बेचैनी, जडपणा आणि वेदना सगळेच उत्तम कमी होते.
ऐरवी तर तुम्ही दही खायला मज्जाव करता मग श्रीखंड कसे खायला सांगता असा प्रश्न पडणे साहजिक आहे. दुधापासून तुपापर्यंतच्या प्रवासात त्यावर जशा प्रक्रिया घडत जातात तसे त्याचे गुणधर्म बदलत जातात. दहयाचे आणि श्रीखंडाचे गुणधर्म पूर्णत: वेगळे आहे.
श्रीखंड हा वसंत ऋतुचर्येतील महत्वाचा भाग आहे. बनवण्यास अतिशय सोपं! ते पारंपरिक पद्धतीनेच बनवावे. उगाच त्यात फळांचे, टूतीफ्रूटीचे तुकडे टाकून, वेगवेगळे ईसेन्स टाकून त्याचे औषधी गुणधर्म कमी करू नये.
वसंत सुसह्य होण्यासाठी ,
वसंत येता दारी श्रीखंड तयार असावे घरी!
शुभ – स्वस्थ वसंत
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७