टाइम या कन्सेप्टवर काम सुरू होते. कुठे कुठे कसा कसा ‘काळाचा’ उल्लेख आलाय त्याची चाचपणी एकत्रितपणे चालू होती.
‘काळ’ हाताळत असताना, त्याची अनुभूती देणार्या ‘चेंज – सातत्याने होणार्या बदलाविषयी’ आणि त्यामुळे घडणाऱ्या इतिहासाविषयी बोलले गेले नसते तरच नवल!
आपली लाडकी वसुंधरा अनेक बदलांना सामोरे जात जात समस्त प्राणी सृष्टीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सिद्ध झालेली आहे. काळाच्या अगणित खुणा तिच्या अंगाखांद्यांवर ती बाळगून आहे. कधीतरी भटकंती करता करता या खुणा दिसतात, आपण काहिशे वर्षे किंवा हजारो वर्ष मागे जातो. तो काळ तर अनुभवण्याचा प्रयत्न करतो. कधी काही गोष्टींची उकल होते तर कधी काही गोष्टींची गूढता अधिकच वाढते.
‘लोणार सरोवर’ हि कालौघातील अशीच एक खूप खूप अद्भुत गूढ अशी खूण !
काही हजारो वर्षांपूर्वी वसुंधरेची ‘जडण -घडण’ सुरू असताना तिची एक ‘स्पेसमेट’ तिला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे एक भले मोठे विवर तयार झाले. ती उल्का घर्षणामुळे पेटली, विरघळली आणि तिथेच विसावली. हे विवर पाण्याने भरले खरे पण हे पाणी या उल्केच्या विशिष्ठ गुणधर्मांमुळे वैशिष्ठ्यपूर्ण झाले. माणसाला पिण्यासाठी अयोग्य ठरले तरी त्याच्या अवती भवती जीव सृष्टी बहरली.
या विवराची अवघड वाट उतरत जाताना अनेक वेगवेगळे दगड, पक्षांचे आवाज, दूरवर दिसणारे मोर आणि हेमाडपंथी मंदिरांचे अवशेष आणि बिबट्याच्या अगदी ताज्या पाउलखुणा उत्सुकता अजून वाढवतात.
प्रत्यक्ष सरोवराजवळ गंधकाच्या ‘सु- वासामुळे’ असेल किंवा ‘क्षारीय प्रभावामुळे’ असेल पण फारसे प्रसन्न वाटत नाही….. पाणी असूनही ‘चैतन्य’ वाटत नाही. त्याच्या आतील केमेस्ट्री त्याच्या इतकीच रुक्ष वाटते. पक्षांना मात्र या कशाशीही घेणे देणे नसते, त्यांचे आणि त्यांच्या चिवचिवाटाचे वैविध्य या वातवरणात प्रसन्नता वाढवतात.
पण या सगळ्यावर मात करत तिथली ‘अद्भुतता’ मात्र सातत्याने जाणवत राहते. एकाच वेळी या सरोवरात कडेने सलाईन प्रमाणे पाणी आणि आत अत्यंत क्षारीय पाणी (Ph 11). तिथली माती चुंबक स्वत:कडे ओढून घेत त्यातल्या लोहाच्या प्रमाणाची कल्पना देते तर कमळजा देवीच्या मंदिरातल्या ओवरीच्या दगडापाशी होकायंत्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या अगदी विरुद्ध चुंबकीय क्षेत्र दर्शवत त्या उल्के बद्दलचे कुतूहल वाढवतात.
याच्या अद्भुततेचे कोडे खुद्द नासाच्या शास्त्रज्ञांना देखील पडले नसते तरच नवल! अनेक संकल्पना मांडूनही अनेक अनुत्तरीत प्रश्न आजही तसेच आहेत आणि त्याचे गूढही !
सरोवर किती जुने आहे या बद्दल अजूनही संशोधन चालू आहे. ५२००० वर्षे की ५ लाख वर्षे कुणास ठाऊक ….काळ फारच मोठा आहे. सरोवराच्या परिसरातली मंदिरे देखील अशीच काही हजार वर्षे जुनी असावीत. आता भग्नावस्थेत असली तरी आपलं सौंदर्य राखून आहेत.
तिथं क्षणभर विसाव्यासाठी थांबलेलं पाऊल तिथून काही केल्या निघत नाही.
खुद्द लोणार गावातले ‘दैत्यसुदनाचे’- भगवान विष्णूचे देऊळ शिल्पकलेचा अत्यंत उत्कृष्ठ नमुना आहे. याच परिसरात मारुतीरायाची शनीचे गर्वहरण करणारी चर्पट मुद्रेतील आवेशपूर्ण मूर्ती एका अखंड पाषाणात कोरलेली असून तिची स्थापना गुहागरच्या कानिटकरांकडून चुकून आडवी झाली आणि त्याला झोपलेला मारुती म्हणून नाव पडले. मूर्ती ज्या पाषाणापासून बनली आहे त्याचे चुंबकीय क्षेत्र हा यातील अत्यंत महत्वाचा भाग. आपल्या नेहेमीच्या चुंबकाच्या विरुद्ध याचे magnetic field आहे.
या दुर्लक्षित सरोवराची अद्भुतता तिथे वारंवार खेचून नेते. कितीदा गेले तरी त्यातला रस कमी होत नाही. या मंदिरांमध्ये माझे आवडते महादेवाचे एक मंदिर आहे, श्री यंत्राप्रमाणे रचना असलेले. त्याच्या गर्भ गृहातल्या काळ्या मिट्ट अंधारात शंभू महादेव विराजमान आहेत. तिथे कमालीची शांतता आहे. पिंडीवरच्या छतावर अत्यंत रेखीव किर्ति मुखे आहेत. कधी गेलात तर या गर्भ गृहात थोडा वेळ नक्की बसा.
कधी कुणी कुठल्या ‘काळी’ या विवराभोवती हे मंदिर संकुल उभारले कुणास ठाऊक? या मंदिरांमुळे या सरोवराची शोभा द्विगुणित झाली आहे हे मात्र नक्की!
कदाचित काही युगे लोटली असावीत….. जोरदार धडकेची भरून न आलेली ही जखम आजही तितकीच ताजी आहे, गूढ आहे आणि तेच तिचं सौंदर्य आहे!
या तळ्याला कुणी गूढ म्हणेल कुणी अद्भुत, ‘काय आहे त्यात’ म्हणत कुणी दुर्लक्ष करेल, तर कुणी मात्र ‘जागतिक वारसा’ म्हणत जतन करेल, शास्त्रज्ञ गहन चर्चा करत त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतील, तर सामान्य त्याच्या काठाकाठाने ………..ते मात्र या सर्वाच्या पलीकडे आपले गूढ आपल्या तळाशी घट्ट घेऊन स्वत:तच मग्न आहे……आपण फक्त त्याच्या काठी बसावे आणि ती मग्नता अनुभवावी!
वैद्य ज्योत्स्ना पेठकर