‘लिखाण वाचनाला’ समर्पित असलेल्या यंदाच्या वर्षाची सांगता ‘हस्त लिखिताने’ व्हावी यासारखे सुख नाही.
कुठलीही भाषा प्रथम बोलून -ऐकून आत्मसात होते. त्याची लिखाणातून अभिव्यक्ती हा पुढचा भाग असतो. उच्चारल्या जाणार्या शब्दांना वेगवेगळ्या पद्धतीने मांडले गेले आणि वेगवेगळ्या लिपी जन्मास आल्या. बोलणे जितके उत्स्फूर्त असते तितकेच लिखाण ‘प्रयत्नपूर्वक’ आत्मसात करावे लागते आणि प्रयत्नपूर्वक साध्य कराव्या लागणार्या या गोष्टीला तितकेच अनन्यसाधारण महत्व देखील आहे.
लिहिणे हे फक्त कागदावर वेगवेगळे आकार चितारणे नाही तर शब्दातून तयार होत जाणार्या वाक्यातून ध्वनित होणारा अर्थ जाणून घेऊन लिहिण्याची प्रक्रिया असते. यासाठी आधी विचारप्रक्रिया सुरू होते, भावनांची उलाढाल होते, शब्दांची चाचपणी होते आणि नेमकेपणाने भावना शब्दांचे अर्थपूर्ण रूप घेऊन कागदावर उमटत असतात. भाषेची समज या पद्धतीने दृढ होते म्हणून हा विकास फक्त भाषेचाच नसतो, तर जाणिवांचा, भावनेचा आणि वैचारिक प्रक्रियेचा देखील असतो.
गोकुळचे हस्त लिखित असावे अशी आमची एक सुप्त इच्छा होती. सातत्याने चालू असणार्या happening activities मध्ये आम्ही इतके बुडालेले होतो की सुप्त इच्छा सुप्तच राहायच्या मार्गावर होती.
जडणघडणीचे वर्ष संपता संपता शेवटच्या दोन आठवड्यात ‘करुयात का हस्तलिखित?’ असे विचारल्याक्षणी हस्तलिखिताच्या बाबतीत पाटी पुर्णपणे कोरी असलेल्या मुलांनी अतिशय ‘आत्मविश्वास’ पूर्वक ‘हो’ म्हंटले आणि सुरू झाला एक खूप सुंदर प्रवास.
वर्षभरातल्या विविध उपक्रमांचे, त्यांच्या अनुभवांचे, त्यांच्या भाव विश्वाचे विषय कागदावर उमटू लागले. स्वाभाविक व्यक्त झालेल्या शब्दांना पुन्हा पुन्हा पडताळून सुसंगतरित्या मांडण्यासाठी एकेका लेखाचे कधी 3 तर कधी अगदी 5 ते 6 वेळा सुद्धा त्यांनी न कंटाळता ड्राफ्ट केले. त्यांच्या कष्टातून त्यांची भाषेची समज समृद्ध होत होती, ललित पद्धतीचे लिखाण म्हणजे काय याचा परीचय होत होता. त्यात जसा जसा आनंद येऊ लागला तसा ‘लिखाणाचा उत्साह’ वाढायला लागला.
त्यांना विषय सुचायला लागले, विचारांची प्रक्रिया कागदावर आकार घेऊ लागली. सुरुवातीला जेमतेम ३० पाने होतील असे वाटत असताना बघता बघता ११८ पाने झाली.
आमचं नांदतं गोकुळ या १५ दिवसात विशेष बहरलं होतं – सगळे जण वेगवेगळ्या कामात गुंतलेले होते, लिखाण चेक करून घेणे , त्यात सांगितलेल्या चुका दुरुस्त करून पुनः लिहिणे, सुचलेल्या विषयाला नेमके कसे मांडता येईल यावर चर्चा करणे, नेमक्या चपखल शब्दाना धुंडाळणे, आपल्या लेखाला छानसे शीर्षक देणे, कागद नीट आखून तयार करणे, कुठले फोटो घ्यायचे, कुठले फोटो कुठे लावायचे, फोटोला काय caption द्यायचे, कागदाला कसे सजवायचे, सगळीकडे अगदी लगीन घाई!
ठराविक वेळेत काम छान पूर्ण करायचे होते – उरकायचे नव्हते हे जवाबदरीचे भान त्यांच्यात नकळतपणे रुजत होते.
बघता बघता सगळी पाने तयार झाली आणि क्रमवार लावून इंदुने जेव्हा ती माझ्या हातात दिली तेव्हा गौरीला पहिल्यांदा हातात घेतले होते त्याच भावना दाटून आल्या. निर्मितीचा आनंद हा खरच शब्दातीत असतो.
हे हस्तलिखित कायम त्यांच्या संग्रही असेल. मोठे झाल्यावर कधीतरी बालपण चाळून बघताना हस्तलिखितातील संग्रहात हस्ताक्षराच्या रूपात स्वत:ची ओळख शोधतील, त्यावेळी त्यांच्या भावना काय असतील हे आम्ही जाणून आहोत.
हे २ आठवडे मंतरलेले होते. सृजनाचा आनंद हा समान धागा असला तरी व्यक्त होताना प्रत्येकाला काहीना काही तरी वेगळे गवसले होते.
मधुराणी आमची पालक आहे, प्रसिद्ध अभिनेत्री आहे पण त्याच बरोबर एक गुणी रसिक आहे, जी साहित्याचा आनंद स्वत: तर घेतेच पण तो इतरांपर्यंत सुद्धा प्रभावीपणे पोहोचवते. अशा प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्वाकडून आमचे पहिले वाहिले हस्तलिखित प्रकाशित झाले. तिचा अभिप्राय आमच्यासाठी प्रेरणा देणारा आहे. पुस्तक पेठ सारखा वाचन संस्कृती रुजवणारा मंच या प्रकाशनसाठी उपलब्ध व्हावा हे देखील आमचे सौभाग्य!
काही गोष्टी आपल्याला प्रयत्नपूर्वक शिकाव्या लागतात. त्या सहज किंवा नैसर्गिक नाही म्हणत त्यांच्यापासून दूर जाणे हे आपल्या भाषिक, वैचारिक आणि भावनिक जडणघडणीला मारक ठरू शकते.
मुळात आपल्यात असलेल्या क्षमताना विविध पद्धतीने सातत्याने पडताळत राहणे हा सर्वांगीण जडणघडणीचा उत्तम मार्ग असतो. यासाठी मुलाना विविध पद्धतीने प्रेरित करणे गरजेचे असते. या वर्षीचे हस्तलिखित हे असेच लिखाण वाचन क्षमतेला प्रेरित करणारे आणि त्या क्षमतेचा पडताळा घेणारे ठरले. मुलं आता आनंदाने लिहिती झालेली आहेत, पुढच्या वर्षीच्या हस्तलिखितात त्यांची कल्पनाशक्ती विशेष लिहिती होईल यात शंका नाही..
शुभं भवतु
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
इंद्रायणी चव्हाण
गोकुळ लर्निंग सेंटर