भारतीय लोक उत्सवप्रिय आहेत. त्यामुळे इथल्या राज्याराज्यात वर्षभर अनेकविध सण साजरे केले जातात. पण १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताकदिन हे भारतभर साजरे केले जाणारे दोन राष्ट्रीय सण आहेत. हे दोन दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे, आनंदाचे आणि अभिमानाचे आहेत. कारण या दोन दिवसांमुळे भारतीयांना आपापले अन्य सणसमारंभ आपापल्या पद्धतीनं साजरे करण्याचं स्वातंत्र्य लाभलं आहे.
आपल्या या राष्ट्रीय सणांना आपण आपल्या राष्ट्र मित्रांना सहभागी करून घेत असतो.
दरवर्षी प्रजासत्ताकदिनासाठी कोणत्यातरी एका देशाच्या प्रमुखांना आपण विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करतो. यावर्षी फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख श्री. इमॅन्युएल मॅक्रॉन आपले विशेष अतिथी होते.
हे एक उत्तम निमित्त कारण होते ‘आपल्या पाहुण्यांबद्दल’ जाणून घ्यायला. अतिथि देश कसा निवडला जातो? त्या मागे आपली भूमिका काय असते? आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध कसे प्रस्थापित केले जातात? अशा सगळ्याच चर्चा गोकुळ मध्ये झाल्या नसत्या तरच नवल !
फ्रेंच खाद्य संस्कृतीचा अजिबातच भाग नसलेल्या एका टोस्टचे आपण ‘फ्रेंच टोस्ट’ म्हणून केलेले बारसे, थोडीफार फ्रेंच गाणी, आयफेल टावर आणि पॅरिसचा फॅशन शो इतकी आपली फ्रांसशी जुजबी ओळख!
लूव्र संग्रहालय, आर्क ऑफ व्हिक्टरी, प्रसिद्ध नदी, पर्वत यांसह फ्रेंच क्रांती, फ्रेंच क्रांतीदिन, फ़्रेंच पदार्थ, फ्रेंच भाषा, इतकेच नाही तर फ्रान्स-भारत सैन्य सराव, युद्धसामग्री व्यापार, अंतराळ योजना सहाय्य, नागरी अणूकरार, फ्रेंच फॅशन-परफ्युम्स, चित्रपट अशी वैविध्यपूर्ण आणि महत्वाची ओळख करून घेणे हा एका नागरिकाच्या जडण घडणीसाठी महत्वाचा विषय.
विचार मांडला गेला आणि मोठ्या मुलांनी जवाबदारी घेत कार्यक्रम आखला.
आतापर्यंत अर्थशास्त्र, भू-राजनीती, इतिहास, भूगोल, पर्यटन, विविध कला, स्थापत्य इत्यादींविषयी केलेल्या चर्चांचा उपयोग या कार्यक्रमाच्या आयोजनात मुलांनी छान करून घेतला. हीच त्यांची खरी परीक्षा असते.
‘अतिथि देवो भव ‘ही आपली शिकवण! त्यांचे मनापासून स्वागत तेव्हाच होईल जेव्हा त्यांना सगळ्या बाजूने जाणून घेतले जाईल.
कार्यक्रम उत्तमच पार पडला. तिकडे आपले सन्माननीय अतिथि आपल्या विविधतेतून नटलेल्या संस्कृतींची झांकी बघत होते आणि इथे आम्ही त्यांच्या देशाची विशेषता!
फ्रांसमय झालेल्या वातावरणात भान मात्र जागेवर होते.
“ पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणीच कोणाचं कायम शत्रू किंवा मित्र नसतं, हे लक्षात ठेवायचंय” सृजन म्हणाला.
“हां रे! चल मालदीवजची करंट न्यूज काय आहे सांग?” विहाननं विचारलं आणि अशा गप्पा मारत प्रदर्शनाची चित्रे आवरली.
नमस्ते फ्रांसचे हे फलित अगदीच खास होते……
इंद्रायणी चव्हाण
गोकुळ लर्निंग सेंटर
९८९०१८०७४