दक्षिणेकडे मकर वृत्तापर्यन्तची मजल मारून आता सूर्याचा प्रवास पुन्हा उत्तरेकडे म्हणजे कर्क वृत्ताकडे सुरू झालाय. ही घटना उत्तर गोलार्धवासियांसाठी इतकी महत्वाची आहे की आपण भारतीय ती आनंदाने साजरी करतो, कुठे उत्तरायण म्हणून, कुठे संक्रांत म्हणून, कुठे लोढी, तर कुठे भोगली बिहू तर कुठे पोंगल म्हणून!
आपले सगळेच सण आणि ते साजरा करण्याच्या विशिष्ट पद्धती ‘ऋतु बदलाचे आणि त्यानुसार बदल करण्याचे ज्ञान’ बिंबवण्याची एक अतिशय उत्तम आणि अर्थपूर्ण प्रथा!
उत्तरायण हमी देतो हळूहळू दिवसाचा म्हणजे प्रकाशाचा आणि उष्णतेचा कालावधी वाढत जाण्याची! या दोन्ही गोष्टींवर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व अवलंबून असते.
उत्तरायण तीन ऋतु घेऊन येतो – शिशिर – वसंत आणि ग्रीष्म!
या संपूर्ण सहा महिन्याच्या कालावधीला आयुर्वेदात – ‘आदानकाल’ म्हंटलं आहे.
आदानकाल शरीरातून / निसर्गातून सगळं बल काढून घेणारा काल आहे. वसंत आणि ग्रीष्म ऋतूंची ऋतुचर्या त्या त्या वेळी देणार आहेच, पण आता लक्षात ठेवायचे आहे की संपूर्ण उत्तरायणात हळूहळू वाढत जाणारे ऊन बळ कमी करत जाणार. उन्हाची तीक्ष्णता प्रखरता जशी वाढत जाईल तसे कोरडेपणा आणि उष्णता वाढीस लागेल. त्यामुळे इथून पुढे उष्ण खाणे टाळायचे. ज्यामुळे वायु वाढेल असा आहार आणि वागणे दोन्ही प्रयत्नपूर्वक टाळायचे.
बळ मुळातच कमी असणार त्यामुळे यापुढे ‘अर्धशक्त्या’ व्यायाम करायचा.
म्हणजेच २५ सूर्य नमस्कार करण्याची क्षमता असेल तर १२ च करायचे. शरीराला अति प्रमाणात थकवायचे नाही. ऋतूचा परिणाम जाणून न घेता खाण्याचे आणि व्यायामाचे आहे तेच रुटीन सुरू ठेवणे अनेकविध आजारांचे कारण होऊ शकते.
ऋतुचर्या स्वस्थ राहण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. सध्या उत्तरायणाचा काल सुरू झाला आहे आणि त्यातल्या तिन्ही ऋतूंमध्ये एकच समान गोष्ट लक्षात ठेवायची आहे – शरीराला आणि मनाला उगाचच ताणायचे नाही, आपली शक्ती मुळातच कमी असणार आहे त्यामुळे अती थकवणारी कामे कमी करायची, उष्ण- तीक्ष्ण आणि शरीराला कोरडे करणारा आहार घ्यायचा नाही.
यंदा हेमंत आणि शिशिर दोन्ही ऋतु ढगाळ हवामानामुळे नेहेमीप्रमाणे अनुभवायला मिळालेच नाहीत.
पण पुढे येणारा ‘वसंत’ आपला प्रभाव नक्कीच दाखवणार, त्याची ऋतुचर्या लवकरच तुमच्या भेटीस येईल.
तो पर्यन्त ‘काळाचा महिमा’ लक्षात घेता त्यानुसार बदल करत स्वस्थ रहा.
शुभ उत्तरायण
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७