‘संगोपन’ हा आपल्या संपूर्ण आयुष्यातला अतिशय महत्वाचा भाग आहे. संगोपन फक्त बाल्यावस्थेचा विषय नाही. बिजावस्थेपासून ते पुढे पंचत्वात विलीन होईपर्यन्त आपले शारीरिक, भावनिक, वैचारिक संगोपन निरंतर सुरू असते.
नाळ प्रत्यक्ष जोडलेली माऊली तर आपले खूप प्रेमाने संगोपन करतच असते पण प्रत्यक्ष नाळ न जोडलेली एक माऊली आपला ‘योगक्षेम’ अखंड वाहत आपले अत्यंत ममत्वेने ‘संगोपन’ करत असते. ‘पडो झडो माल वाढो’ म्हणत सगळ्या चढ उतारातून आपण जात असताना लांबून आपल्यावर लक्ष ठेवून असते. आपल्या ‘स्व अध्ययनावर’ या माउलीचा विश्वास असतो. आपल्या प्रत्येक लेकराचे प्रारब्धानुसार येणारे भोग ती बघत असते आणि त्यात धडपड करून आयुष्याचे धडे माझे लेकरू नीट शिकतय न याकडे लक्ष ठेवून असते. प्रपंचातील आईची चिंता ‘पुस्तकी’ शिक्षणाची असते तर या माऊलीची चिंता ‘खर्या ज्ञांनाच्या’ प्रवासाची.
.खरे तर वैभव दादा म्हणतात त्याप्रमाणे
“ सात जन्माची हि फेरी विठ्ठला
येणे जाणे तुझ्या दारी विठ्ठला
माझे जिणे तुझी वारी विठ्ठला”
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आपला प्रवास एक वारीच तर आहे न, आणि ही वारी ज्या उद्देशाने आपल्याला लाभली आहे तो उद्देश सफल होतोय न याकडे या माऊलीचे खूप लक्ष असते.
आपल्यातूनच निघालेला एक अंश जेव्हा कधी हतबल होतो, निराश होतो, अज्ञानाच्या अंधारात वाट हरवून बसतो, त्यावेळी वेगवेगळ्या रूपात त्याच्या मदतीला ही माऊली धावून जाते. तुम्ही तिची भक्ती करता की नाही अशी अट ती घालत नाही! मग विचार करा आपल्या या आद्य बिजाशी आपण जर भक्तीने श्रद्धेने जोडलेले राहू तर काय काय साधता येईल..
आयुष्यात पदोपदी लागणारा हा दृढ विश्वास अगदी साध्या सहज भक्तीमार्गाने वारकर्यांनी स्वीकारला, पिढ्यांपिढ्या रुजवला-बिंबवला.
अशाच एका वाट हरवलेल्या उद्वस्त झालेल्या सौदामिनीला ‘ती’ माऊली आपल्या पाठीशी आहे याची प्रचिती देणारा अनुभव म्हणजे ‘#ज्याचात्याचाविठ्ठल’ !
खरं तर दोन तासांच्या नितांत सुंदर प्रवासात प्रचिती सौदामिनीला फक्त नव्हे तर आपल्याला देखील येते.
‘कमाल’ ‘अद्वितीय’ हे शब्द देखील अपुरे वाटावेत असे देखणे सादरीकरण!
मधुराणी एक गुणी आणि अत्यंत ताकदीची अभिनेत्री आहे, तिच्या क्षमतेला योग्य न्याय देणारी भूमिका तिला मिळाली आहे आणि तिने अर्थातच तिने त्याचे सोने केले आहे. केवळ वाचिक अभिनयातून जी सौदामिनी साकारली आहे ती अद्वितीय आहे.
मधुराणी, अमित वझे आणि गजानन परांजपे यांच्या वाचिक अभिनयातून ताकदीने उभी केलेली कथा पडद्यावर ‘मिलिंद मुळीकांच्या’ कुंचल्यातून अधिकच साकार होत जाते, योग्य जागी पेरेलेले सुश्राव्य अभंग – दोहे , सुरेल वाद्यांचा मेळ मनाचा ठाव घेतात आणि आपणही नकळत वारीत चालू लागतो! मनाच्या खोलवर गाभाऱ्यात ढवळले जाते आणि भावना अश्रुरूपात झरझर पाझरु लागतात. हे अश्रु न दु:खाचे असतात न आनंदाचे ही एक वेगळीच विलक्षण अनुभूती असते.
एकाकी पडलेल्या विषण्ण अवस्थेतल्या पूर्णत: शून्य झालेल्या सौदामिनीला वारीच्या प्रवासात जेव्हा अनोळखी लोकांकडून निरपेक्ष प्रेम मिळू लागते, जे आहे त्यात आनंदी वृत्ती जपणारी माणसे ती अनुभवू लागते, तेव्हा कुठेही कुणीही काहिही उपदेश न करता तिला आपोआप जाणिव होऊ लागते, ती आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जोडली जाऊ लागते – जणू काही विठू माऊली वेगवेगळ्या रूपात तिच्या पोळलेल्या मनावर मायेने केलेल्या संगोपनाची फुंकर घालते. याची प्रचिती आपणही कधीतरी घेतलेलीच असते म्हणून या सौदामीनिशी आपण सहज एकरूप होतो.
गेली अनेक वर्ष शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे बिजावस्थेपासूनच ‘संगोपनाचे’ काय महत्व असते याचा पदोपदी अनुभव घेत आहे. वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर वाढते नैराश्य, बेचैनी, अशांतता, अस्थिरता, अराजकता या सगळ्या आव्हानांशी दोन हात करताना आपल्या सांस्कृतिक मुळांशी आपण घट्ट असणे हि आता काळाची गरज आहे!
काही गोष्टी मनोरंजनासाठी असतात तर काही ‘आत्म भानासाठी’!
ज्याचा त्याचा विठ्ठल ही ज्याची त्याची प्रचिती आहे , अवश्य अनुभवा सौदामिनीच्या वारीचा प्रवास आणि माऊलीची प्रचिती देखिल!
पुंडलिक वरदा हारी विठ्ठल!
माऊली माऊली
वैद्य ज्योत्स्ना पेठकर