शिक्षणाची प्रचलित वाट सोडून वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू करून 13 वर्षे झाली. अनेक चढ उतारातून स्थिरावलेले conceptual learning आता छान आकार घेतंय. अभ्यास क्रमाच्या चौकटीपासून मुक्त असलेली जडणघडण सर्वांगाने ‘सखोल’ बहरते आहे. दहावी – बारावीचे प्रचलित उंबरठे यशस्वीपणे ओलांडून आमची मुलं आत्म विश्वासाने पुढे वाटचाल करत आहेत.
काळाचा महिमा बघता वौचारिक, सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक आणि भावनिक अशा सर्व स्तरांवर होणारी संतुलित जडण घडण ही काळाची गरज आहे याची प्रचिती वारंवार येतेय.
कुठलीही गोष्ट जाणून घेण्याची स्वाभाविक इच्छा हा निसर्ग आहे , त्याला योग्य ते खतपाणी घालत घालत शिकणार्याला त्यात सक्रिय सहभागी करत करत, त्याच्या पंच ज्ञंनेंद्रियाद्वारे ‘अनुभूती’ घेत त्याचे ‘संगोपन’ ( nurturing) घर , गुरुकुल आणि समाज या तिन्ही स्तरांवर होत असते., व्हायला हवे. कुतूहल अभ्यासक्रमाच्या चौकटीत गुदमरून जाते आणि पर्यायाने शिक्षणाचा आनंद देखील.
जन्मत:च मिळालेले नैसर्गिक स्वास्थ्य निसर्गाशी – पंच महाभूतांशी समतोल साधत जपता येते. पण तहान भूक, झोप, मल मुत्राचे वेग या सारख्या स्वाभाविक संवेदांनाना डावलून निसर्गाच्या पूर्णत: विरोधात जात हाती उरते ते फक्त ‘सातत्याने येणारे आजारपण’! जे सहजसाध्य आहे त्याचा शोध मग औषधातून आणि निरनिराळ्या fads मधून शोधण्याचा असफल प्रयत्न होत राहतो.
स्वास्थ्य आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात काम करताना प्रकर्षाने जाणवली ‘निसर्गाशी फारकत’!
या दोन्ही क्षेत्रात समान धागा आहे ‘पंच महाभूतांचा’!
निसर्गातील एक घटक असल्यामुळे त्यात ऋतुप्रमाणे पाचही महाभूतात होणार्या बदलांचा परिणाम शरीरावर देखील होत असतो आणि तो समजून उमजून आपल्या आहारात योग्य ते बदल केले की ‘प्रसन्न आत्म मन आणि इंद्रिय’ जीवन खर्या अर्थाने समृद्ध करतात.
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाचही पद्धतीने ज्ञांनाची अनुभूती घेतली जात असते. हे पाचही ज्ञानेंद्रिय एकेका महाभूताचे अधिष्ठान आहे.
उत्तम शिक्षण आणि स्वास्थ्य या मूलभूत गरजा जेव्हा आपल्या जीवनात सहज साध्य असतील तेव्हाच आपण म्हणून शकू हेच खरे जीवन – ‘खलु जीवनम्’ !
खलु जीवनम् हे एक व्यासपीठ आहे जिथे स्वास्थ्य आणि शिक्षण यांची सर्वांगीण जडण घडण निसर्गाशी समतोल साधत साधली जाते. माहिती फक्त नाही तर ‘ज्ञान’ आहे, असे ज्ञान जे प्रत्येक बाबतीत तुम्हाला भानावर आणत आहे. म्हणजे बघा चातुर्मासात मांसाहार, कांदा, लसूण, आंबवलेले पदार्थ खाण्यावर घातलेली बंदी ‘पूर्णत: स्वास्थ्याशी निगडीत’ आहे हे ज्ञान घेणे आणि त्यानुसार भान ठेवत ते पदार्थ टाळणे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते आणि असे जगणे म्हणजेच ‘खलु जीवनम्’!
शिकण्याच्या क्रियेत मुलं आनंदाने सक्रिय सहभागी होत पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभूती घेतात, जेव्हा त्यांच्या वैचारिक प्रक्रियेवर काम केले जाते, गरज आणि आवड यातील भेद – सापेक्षता त्यांना कळते आणि भावनिक जडण घडणीवर भर देत जे शिक्षण त्यांना त्यांच्या मुळाशी घट्ट जोडून ठेवते त्या शिक्षणाने बहरणारे आयुष्य हे ‘खलु जीवनम्’
आजवरच्या प्रवासात आलेली प्रचिती आता ‘खलु जीवनम्’ या नावाने विस्तारत आहे, आमची डिजिटल ओळख प्रस्थापित होत आहे.
पेरून ठेवलेली बीजे आता फळं देत आहेत, खलु जीवनम् चा लोगो आणि त्याची टॅग लाइन हे त्याचेच प्रतीक आहेत. लोगो डिजाइन करणारी वेदिका आणि टॅग लाइन संस्कृत मधून करून देणारी गौरी या आमच्या दोन्ही गुणी विद्यार्थिनी आता पुढचे उच्च शिक्षण घेण्यासाठी सज्ज आहेत.
या संकेत स्थळाचे लोकार्पण उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री चंद्र्कांत दादा पाटील यांच्या हस्ते व्हावे हा अलभ्य लाभ. उदघाटनाची औपचारिकता बाजूला ठेवत कुतुहलाने आमचे काम समजावून घेणारे चंद्रकांत दादा किती समजाभिमुख आहेत याचा प्रत्यय आम्हाला आला.
रॉबर्ट फ्रोस्ट च्या कवितेत म्हंटल्याप्रमाणे,
“Dark is what brings the light inside you”
अनेक अडचणींवर मात करत ‘राष्ट्र प्रथमच्या’ कार्यात हा मैलाचा दगड गाठताना मी आणि इंदु समाधानी आहोत. अजून आमची ‘गोष्ट इथे संपलेली नाही’ ! खलु जीवनम् च्या माध्यमातून स्वत:च्या आणि समाजाच्या वैचारिक, बौद्धिक, भावनिक, संस्कृतिक आणि सामाजिक जडण घडणीतून ‘ज्ञानापासून भानापर्यंतच्या’ प्रवासासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत.
शुभम् भवतु
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
इंद्रायणी चवाण