वसंतापासूनच खरं तर उष्णतेची चाहूल लागते. हळूहळू ती वाढत जाते…आणि लक्षात येत जातं ‘तहान’ खूप जास्त लागतेय, घरातील पंखे, AC, कुलर, फ्रीज वापरात यायला लागलेत! वरती त्याने आग ओकायला सुरुवात केलेली असते आणि निसर्गातीलच नाही तर शरीरातील पाणी देखील शोषून घ्यायला त्याने सुरुवात केलेली असते.
ग्रीष्म सुरु झालेला असतो…..ऋतू बदलला की आपली ज्ञानेंद्रिये त्याची जाणीव करून देतच असतात, गरज असते आपल्या योग्य त्या प्रतिसादाची!
आपण माठ आणि वाळ्याची तजवीज करतो, उन्हात बाहेर पडताना टोपी, छत्री आणि गोगल्स विसरत नाही, त्वचा काळवंडू नये म्हणून सनस्क्रीन्सची खरेदी होते, मऊ सुती पांढरे शुभ्र कपडे घालून प्रखरता कमी करण्याचा प्रयत्न करतो, थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जातो……ग्रीष्माला आपण हा असा प्रतिसाद देतो!
पण फक्त एवढाच प्रतिसाद अपेक्षित नाहीये… ऋतूप्रमाणे आपली भूक, आपला आहार, आपली झोप, आपला व्यायाम सगळ्यातच बदल होणे अपेक्षित असते. यालाच आपण ऋतुचर्या म्हणतो.
ग्रीष्माचा काय परिणाम होतो –
ग्रीष्म सुरु होतो आणि त्याच्या ‘प्रखरतेची’ प्रचीती येते. अति उष्णता शरीरातले पाणी शोषून घेते परिणामी शरीरात कोरडेपणा वाढू लागतो. हा कोरडेपणा हिवाळ्यातील कोरडेपणाहून वेगळा असतो. सृष्टीचे तपमान वाढते तसे आपल्या शरीरातले तापमान देखील वाढते आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी शरीर ‘घाम’ आणवून body cool down ठेवण्याचा प्रयत्न करते. पाणी कमी पडायला नको म्हणून ‘तहान’ हे लक्षण वारंवार उप्तन्न होते. घामावाटे फक्त पाणीच नाही तर शरीरातले मीठ देखील बाहेर पडते. त्यामुळे थकवा जाणवतो. शरीराला विश्रांतीची गरज भासू लागते आणि त्यामुळे दुपारी डोळ्यांवर झापड येते. गरम च्या विरुद्ध गुणांची म्हणजे ‘थंड’ गोष्टींची इच्छा होते.
भूक –
भूक हि खूप बेसिक आणि महत्वाची ‘संवेदना’ आहे. आतून पोषणाची गरज ‘भूक’ या जाणीवेतून पूर्ण केली जाते. ऐरवी भूक न लागण्याची कारणे तुमच्या ‘पचनशक्तीशी’ निगडीत असतात, पण ग्रीष्मात निसर्गत:च भुकेची संवेदना कमी असते. जाणिवा डावलून म्हणजे भूक लागलेली नसताना घेतलेला आहार नीट पचत नाही आणि न पचलेल्या गोष्टी अनेक आजारांना ‘आमंत्रण’ देतात. त्यामुळे ग्रीष्मात भूक ओळखून आहार योजना करावी.
पचनशक्ती कमी असताना आहार पचायला हलका असावा हे खरं तर गृहितच आहे. फक्त पचायला हलके काय असते या बद्दलच्या कन्सेप्ट क्लियर असाव्यात.
तहान कशी भागवावी –
तहान लागली की पाणी तर प्यायलाच हवे. पण फक्त पाण्याने तहान भागणार नाही. दिवसभरातून लिंबू सरबत, कोकम सरबत, वाळ्याचे, आवळ्याचे, गुलाबाचे सरबत, कैरीचे पन्हे, नारळ पाणी, नीरा,वाळ्याचे पाणी या गोष्टी फक्त तहानच भावगत नाही तर शरीराला आवश्यक मीठ-साखरेचा पुरवठा देखील करतात आणि प्रसन्नता, तोंडाला चव देखील येते. या पदार्थांमध्ये शरीराला निसर्गत: थंड करण्याची क्षमता असते, त्यामुळे बर्फासारखी फक्त स्पर्शाला थंड असणारी गोष्ट यात न टाकलेली बरी. कारण स्पर्शाला थंड असलेला बर्फ शरीरात जाऊन उष्णता निर्माण करतो.
दही आणि ताकाचे काय?
जो नियम बर्फाला तोच दह्याला. मटक्यात लावलेले असो अथवा साध्या भांड्यातले दही कायमच आपल्याला ‘हाकारत’ असते. स्पर्शाला थंड म्हणून आपण उन्हाळ्यात आवर्जून दही भात, नुसते दही, किंवा दह्यातल्या कोशिंबिरी खातो पण त्याचा गुण उष्ण आहे हे मात्र आपल्याला नाहीत नसते. शरीरातील उष्णता आधीच वाढल्यामुळे पुन्हा दही खाऊन उष्णता वाढवण्यात शरीराचे नुकसानच आहे.
दह्याला घुसळून त्यात पाणी टाकून ताक बनवले जाते. म्हणजेच dilute केले जाते. त्यामुळे त्याची माफक उष्णता ‘पाचक’ म्हणून काम करते. त्यामुळे प्रमाणात ताक घेण्यास हरकत नाही. दही पचायला जड तर ताक मात्र हलके.
फळे –
निसर्ग ऋतूप्रमाणे सेट झालेला असतो…हळूहळू वाढत जाणाऱ्या उष्णतेला अनुसरून टप्प्या टप्प्याने द्राक्षे, संत्री, कलिंगड, टरबूज अशा रसाळ फळांचा आणि सरतेशेवटी मधुर, रसाळ, प्रिय आंबा अशा फळांचा हंगाम येतो. फळांचा कालावधी माहिती असणे महत्वाचे आहे. हल्ली वेळेच्या आधी फळे येतात, खाल्ली जातात आणि मग आजारपणाची लक्षणे सुरू होतात.
मार्च महिन्याच्या मध्यापासून तहान भागवणे, उष्णता कमी करणे यासाठी कलिंगड, टरबूज चावून खाणे उत्तमच. एप्रिलच्या अखेरीस येणारे महत्वाचे फळ म्हणजे आंबा! उन्हाळ्यात कोरडेपणा खूप वाढतो त्यामुळे गोड चवीचा, पोषण करणारा, नुसत्या वासाने देखील प्रसन्नता देणारा आंबा तर खाल्लाच पाहिजे. दुधात मिल्कशेक स्वरुपात न खाल्लेला बरा. आमरसात आवर्जून साजूक तूप टाकावे म्हणजे तो बाधत नाही.
आईस्क्रीम –
उन्हाळ्यात गारेगार आईस्क्रीम, बर्फाचा गोळा खावेसे वाटणे अगदी साहजिक आहे. खाताना थंड लागणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात मात्र शरीरात उष्णता निर्माण करतात. शरीरात उष्णता टिकवून राहण्यासाठीच बहुदा थंड प्रदेशात या खाद्य पदार्थाची उत्पत्ती झाली असावी. त्याच्या या विशिष्ठ गुणधर्मामुळे थंडीत ice cream खायला हरकत नाही.
भाज्या –
या ऋतूत आता हळूहळू भाज्या कमी होऊ लागतात. मोजक्याच फळभाज्या मिळतात. आपला सगळा भर कड धान्यांवर असतो. मोड न आणता नुसते भिजवलेले हिरवे मूग, मटकी, मसूर खायला हरकत नाही.पण बैठी काम करणाऱ्यांनी शक्यतो मोड आलेली धान्ये टाळावीत. भाज्या करताना एकच गोष्ट लक्षात ठेवूयात की निसर्गात आधीच भरपूर उष्णता आहे त्यात ‘मसालेदार’ खाऊन अजून उष्णता वाढवायला नको. रोजचा स्वयपाक हा मसाल्या शिवाय देखील उत्तम होतो. मांसाहार मसाल्याशिवाय बनतच नाही, शिवाय मांस पचायला जड देखील असते. त्यामुळे शक्यतो मांसाहार देखील टाळावा.
या ऋतूत आवर्जून खावी अशी भाजी म्हणजे ‘आंबटचुका’. या दिवसात ती येते देखील भरपूर. अत्यंत चविष्ट, पाचक, सारक, आणि तहान भागवणारी भाजी आहे.
झोप –
ऐरवी ‘दिवास्वाप’ म्हणजे दुपारच्या जेवणानंतर झोपणे वर्ज्य असते, पण ग्रीष्म याला अपवाद आहे. दुपारच्या जेवणानंतर डोळ्यावर चांगलीच झापड येते. अशावेळी झोपेचा वेग ( natural calls) अडवू नये. १० ते १५ मिनिटांची ‘वामकुक्षी’ अशा वेळी महत्वाची असते.
व्यायाम –
मुळातच ग्रीष्मात घाम जास्त येत असतो, थकवा येत असतो, शरीर आतून कोरडे पडत जात असते, अशा परिस्थितीत हिवाळ्याप्रमाणे भरपूर व्यायाम जर आपण तसाच चालू ठेवून शरीराला उगाच ताणले तर ते शरीर स्वस्थ्यासाठी योग्य ठरत नाही. तुमच्या कुठल्याही व्यायाम प्रकाराचा तुमच्या metabolism वर परिणाम होतच असतो.
तुमची जेवढी क्षमता आहे व्यायामाची त्याच्या निम्मे तुम्ही व्यायाम करा. खूप थकण्याआधी थांबले पाहिजे.
सहजतेने करता येणारी ‘योगासने’ हा उत्तम पर्याय असतो पण ते देखील क्षमतेच्या निम्मे.
शरीराला असे क्षमतेच्या पलिकडे खेचल्याचा परिणाम तुमच्या पचन शक्तीवर होत असतो. परिणामी ‘मी इतका व्यायाम करते पण तरीही काहीतरी प्रोब्लेम येतातच’ अशी वाक्ये ऐकू येतात.
अगदी छोट्या आणि सध्या गोष्टी आहेत ज्या पाळायला देखील अतिशय सोप्या आहेत. पण ज्याच्यावर आपले पोषण अवलंबून आहे त्या आहाराच्या बाबतीत ऋतूप्रमाणे बदल केलेले सहसा आढळत नाहीत. परिणामी उष्णता साचत जाते. त्याची लक्षणे वेळोवेळी दिसतात पण कुठल्याच lab report मध्ये ती न दिसल्याने आपल्या लेखी याला फारसे महत्व उरत नाही.
शरीराला आणि ऋतूला हे असे गृहीत धरणे वेगवेगळ्या आजारांची नांदी ठरते. त्यामुळेच technologically advanced युगात ‘स्वास्थ्याची’ मात्र वानवा आहे. खरं तर प्रगत देशाचे खरे लक्षण स्वस्थ प्रजा असते, ओसंडून वाहणारे दवाखाने हे प्रगतीचे लक्षण नक्कीच नाही.
सध्याची एकूण परिस्थिती बघता….स्वास्थ्याचा पाया मजबूत करण्यासाठी ऋतूचर्येचे महत्व आता सगळ्यांनाच कळू लागले आहे. तुमच्या वयानुसार, कामाच्या स्वरूपानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ,कल्चर नुसार, तुमच्या नजीकच्या वैद्यांकडून स्वत:ची ऋतुचर्या नक्की आखून घ्या.
शुभ ग्रीष्म!!!
वैद्य ज्योत्स्ना पेठकर