‘बालादपि सुभाषितम् ग्राहयम्!’ अशी शिकवण देणारी आपली संस्कृती! सजीव -निर्जीव, वयाने ,शिक्षणाने ,अनुभवाने ,कार्याने प्रत्येक लहान थोराकडून, वेगवेगळ्या प्रसंगातून आपण चांगले अथवा वाईट घेतच असतो. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला गुरु लाभत जातात.
‘गुरु’ आणि ‘ज्ञान’ यांचा अन्योन्य संबंध आहे. संपूर्णत: ‘जीवनाभिमुख’ असलेले ज्ञान धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषांच्या प्राप्तीसाठी ‘साधन’ असते.
आयुर्वेदाला प्रवेश घेतला तेव्हा ‘BAMS’ डिग्री मिळवून डॉ.बिरुद लावणे इतकेच कळले होते, पण वैद्य जुवेकर गुरु म्हणून लाभले आणि आयुर्वेद शास्त्राकडे, त्यातल्या शाश्वत सूत्रांकडे बघण्याची त्यांनी दिलेली दृष्टी आजही सर्वत्र कामी येते. गुरु लाभले महणून between the lines अर्थ कळत गेले, concepts पक्क्या होत गेल्या. करोना काळात धाडस करू शकले ते यामुळेच.
धर्म, अर्थ आणि विविध कामना यांच्या पलीकडे प्राप्त करवून घ्यायचे एक ज्ञान असते ‘आत्म ज्ञान’ आणि त्यासाठी मार्ग असतो ‘साधनेचा’! या साधनेसाठी आपण गुरूंना नव्हे तर गुरूंनी आपल्याला हेरून ठेवलेले असते, फक्त योग्य वेळ येण्याची ते वाट पाहत असतात.
शंकर महाराजांनी मला शिष्या म्हणून कदाचित कधीच हेरून ठेवले होते. माझे ‘भोग’ पुरे होताना ते लांबून लक्ष ठेवून होते. उंच कड्याच्या अगदी टोकाशी असताना खाली पडू दिले नाही. कसोटीच्या प्रसंगी विवेक ढळू दिला नाही. कासवाचे पिलु जसे जीव मुठीत घेऊन किनार्याची ती जीवघेणी शर्यत पार करून एकदाचे अथांग सागरास जाऊन मिळते तसेच काहीसे आपले होत असते. अर्थात याची योजना त्यांनी आधीच करून ठेवलेली असते.
शंकर महाराजांनी आणि परात्पर गुरु स्वामी समर्थांनी ‘आम्ही आहोत घाबरू नकोस’ ही प्रचिती वारंवार दिली. परीक्षा भरपूर घेतली पण योग्य वेळी माझ्या सभोवती योग्य माणसे त्यांनीच पेरली.
त्यांच्या या असीम कृपेमुळे ‘स्वामी राधाकृष्ण दशपुत्रे’ मला ‘गुरु’ म्हणून लाभले. त्यांनी मला त्यांची शिष्या म्हणून स्वीकारले आणि माझी ‘महाशक्तीची’ साधना सुरू झाली. हा ज्ञानाचा मार्ग माझ्यासाठी पुर्णपणे वेगळा होता.
महाशक्ती या नावातच सर्व काही आले. सर्व देव देवता सुद्धा महाशक्तीच्या आज्ञे बाहेर नाही. सृष्टीचा हा सर्व प्रपंच ती चालवत असते. विविध departments ची जवाबदारी तिने विविध देव देवताना दिलेली आहे. उत्पत्ति -स्थिति- लय सगळच तिच्या आधीन. जन्माला घातलेल्या प्रत्येक जीवाची जवाबदारी ती ‘माता’ म्हणून बघत असते. हा सगळा प्रपंच ती कसा चालवते या संदर्भातला ग्रंथ तो ‘प्रपंच रहस्य’. आदि शंकराचार्यांनी देवीची स्तुती करताना ‘सौंदर्य लहरी’ ग्रंथ लिहिला. पुढे भास्काराचार्यांनी त्यावर भाष्य करत ग्रंथ पूर्ण केला. परशुरामांनी ही विद्या भूलोकी आणली आणि ‘गुरु शिष्य’ परंपरेने आजही महाशक्तीची उपासना चालू आहे.
याच गुरु शिष्य परंपरेतील आचार्य ‘स्वामी नीळकंठ जोशी’ अप्पांना म्हणजेच राधाकृष्ण दशपुत्रे यांना गुरु महणून लाभले आणि आज या गुरु परंपरेत ज्ञान साधनेसाठी माझी वर्णी लागली.
अप्पांनी रामेश्वरम मंदिराचा कार्यभार काही वर्षे सातत्याने सांभाळत संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अनेको देशांमध्ये या विद्येचा त्यांनी प्रचार प्रसार केला. बर्याच ठिकाण लक्ष्मी यंत्रालाच श्रीयंत्र समजले जायचे, पण अप्पांनी अनेको शिष्य तयार करून श्री विद्येचे खरे स्वरूप रुजवले. त्यांच्या शिष्यांच्या यादीत माझ्यासारखी सामान्य व्यक्ती आहे तसेच अनेक क्षेत्रातील अनेको दिग्गज आहेत, देशो देशीचे हिंदू अध्यात्माचा अभ्यास करणारे साधक आहेत आणि आम्हाला सर्वांना त्यांचे सारखेच प्रेम मिळते. अनुग्रह घेताना मी चाचरत चाचरत माझी लौकिक अर्थाने असलेली ‘जात’ सांगितली. कारण मला या मार्गातील काहीच माहिती नव्हती. पण आप्पांनी मला जात, धर्म, संप्रदाय आणि देश या पलीकडे असलेले ‘आत्म’ तत्व समजावून सांगितले आणि तिथूनच माझ्या ज्ञानाचा प्रवास सुरू झाला. आपले मिसाईल मॅन आणि भूतपूर्व राष्ट्रपती ‘अब्दुल कलाम’ त्यांचे परममित्र, त्यामुळे अध्यात्मासोबतच विविध शास्त्रांचा त्यांचा भरपूर अभ्यास! त्यामुळे त्यांच्यासोबत ग्रन्थोक्त ज्ञान विज्ञानाच्या पातळीवर जाणून घेताना खूप मजा येते.
अनुग्रह देताना दिलेला बीज मंत्र जणू काही या रहस्यात शिरणारा एक पासवर्ड आहे. हे रहस्यज्ञान खूप अथांग आहे आणि या आत्मबोधानंतर जाणून घेण्यासारखे काही उरत नाही. कदाचित काही जन्म साधना केल्यावर एखादा अंश कळावा.
माणसाच्या पतनाचे जितके मार्ग आहेत त्या पेक्षा कितीतरी जास्त मार्ग त्याच्या उद्धाराचे असतात आणि ते सगळे मार्ग ‘गुरुकृपेनेच’ साध्य होता असतात.
गुरु शिष्य पद्धती आणि ज्ञानाची परंपरा अशीच अखंडित राहो!
वैद्य ज्योत्स्ना पेठकर