आपले जगणे सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असते. आपला कललेला अक्ष घेऊन वसुंधरा युगानुयुगे भास्कराला प्रदक्षिणा घालते आहे. तिच्या या निरंतर व्रता दरम्यान सहा ऋतूंचे सहा सोहळे ती साजरे करते. ब्रह्मांड आणि पिंड दोन्हीही पंच महाभूतांनी बनलेले, त्यामुळे निसर्गात झालेल्या बदलांचे पडसाद आपल्या शरीरावर जाणवू लागतात.
ऋतु बदलांचे म्हणजेच काल बदलांचे आपल्या जगण्यावर होणार्या आंतर्बाह्य परिणामांचे ज्ञान पिढ्यांपिढ्या देण्यासाठी योजना झाली – सणांची !
शिशिराची बोचरी थंडी संपत आली की आपण उत्तरायण साजरा करत ‘वसंताच्या’ आगमनाचे स्वागत करायला सज्ज होतो.
विविध रंगांनी नटलेला वसंत जीवनाची आशा पल्लवित करतो, आल्हाददायक भासतो.
आल्हाददायक वसंताचे चार दिवस लोटले की पुढे तीव्र होत जाणाऱ्या उन्हाची चाहूल लागते. सजीवांचे अस्तित्व जिच्यावर अवलंबून आहे अशी ती उष्णता! सृष्टीच्या उत्पत्ती -स्थिती बरोबरच ‘प्रलयाला’ देखील कारणीभूत ठरणारी. या वाढत जाणाऱ्या उष्णतेचे प्रतिक म्हणून ‘अग्नीची’ पूजा – होळी!
धगधगत्या सूर्यप्रमाणे धगधगत्या अग्नीची पूजा करतेवेळी नारळ अर्पण करून तिच्या भोवती पाण्याचे गोल रिंगण करायचे. जणू काही ‘तू आवश्यक आहेसच पण या पाण्याच्या कुंपणापलीकडे येऊ नकोस’ किंवा ‘उष्णतेला शितलतेने जिंकायचे’ हे सांगणारे प्रतिक.!. नकळत ग्रीष्मात ‘पाण्याचे’ अथवा शुद्ध मराठीत हायड्रेशन चे महत्व बिंबवणे.
अग्नी शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याच्या राखेने – भस्माने ‘धुळवड’ अथवा ‘धुळी वंदनाचे’ देखील तेच महत्व. अग्नीपूजनात भाजले गेले, जखमा झाल्या तर याच राखेने किंवा भस्माने ती बरी व्हावी.
कोरड्या, निष्पर्ण, राखाडी शिशिरानंतर पिवळा धम्मक बहावा, लाल चुटुक पलाश, जांभळा निलमोहोर, आरक्त गुलमोहोर, गुलाबी रंगांची वेगळीच छटा धारण केलाला गिरीपुष्प आणि या सगळ्यांवर मात करत केवळ सुगंधाने ‘सुखावणारा’ मोगरा सृष्टीला नितांत सुंदर बनवतात.
हे रंग मनोहारी असतात, सुखावणारे असतात. रंगांची ही प्रसन्नता आपण शरीरावर धारण करतो आणि रंगपंचमीला रंगांची उधळण करतो.
सृष्टीशी एकरूप होण्याचे आणि काळानुसार वागण्याचे ज्ञान देणार्या सणांच्या परंपरेतील ‘होळीच्या सणाच्या’ सर्वांना खूप खूप शुभेछा!
ग्रीष्माची दाहकता सर्वाना सुसह्य होवो!!!!.
– वैद्य ज्योत्स्ना पेठकर