माघ महिना संपायला आलाय आणि त्यासोबत संपता संपता वाढयला लागला आहे – कोरडेपणा! एकीकडे वाढते ऊन आणि वाढता कोरडेपणा – एकमेकाना पूरक असणार्या या जोडगोळीमुळे आपल्याला मात्र
घशाला कोरड पडणे, त्वचा ओढल्यासारखी वाटणे, डोळे ओढल्यासारखे वाटणे, पोटर्याना घोळे येणे, पाय ओढल्या सारखे वाटणे, थकवा, डोळ्यांवर वारंवार झापड येणे अशी लक्षणे त्रास देऊ लागली आहेत.
त्यातच वसंताच्या प्रभावामुळे सर्दी, खोकला, नाकातून पाणी गळणे, डोके जड होणे अशाही गोष्टी आहेतच.
औषध, ऋतुनुसार आहार आपल्याजागी महत्वाची आहेतच, पण त्याच बरोबर काही खास रेसिपी आहारात घेतल्या तर वर वर्णन केलेली लक्षणे पटकन बरी होतात शिवाय चवीत देखील बदल होतो.
आपल्याकडे अगदी सहज मिळणाऱ्या दोन गोष्टी यासाठी आपल्याला लागणार आहेत – बीट आणि कोकम!
साल काढून स्वच्छ धुंवून, बिटाचे तुकडे करून, पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्या. गार झाल्यावर त्यात कोकम सरबत तीन ते चार चमचे घाला, त्यात चावीनुसार मीठ, जिरे पावडर आणि अगदीच हवे असल्यास थोडे लाल तिखट घालून एकदा छान उकळी आणा. झाले तुमचे स्वास्थ्य वर्धक सूप तयार.
यात कोकम सरबता ऐवजी जर तुम्हाला कोकम आगळ टाकायचे असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, फक्त त्यात साखर नंतर घालावी लागेल.
या साध्याशा आणि सोप्या रेसिपीतून तुम्हाला अगणित फायदे मिळतात. कोरडेपणा, थकवा, शोष ताबडतोब कमी होतात.
तहान भागवण्यासाठी शहाळे हा पर्याय असतोच, पण सध्या त्यामुळे कफ वाढण्याची शक्यता जास्त. साधारणत: मार्च अखेरीस शहाळ्याचा वापर करू शकतो. कोकम सरबताने तहान भागेल, उष्णता कमी होईल, पोटात gases धरणार नाहीत, तोंडाला चव येईल, प्रसन्न वाटेल पण त्याच्या जोडीला जेव्हा बिटाचे विशेष गुणधर्म जातील तेव्हा त्यांचा जास्त फायदा होईल.
आता तुम्ही विचाराल की मग बीट – गाजर – टोमॅटो असे सूप नही का चालणार? चालेल की, पण आता या ऋतुला आपल्याला दोन गोष्टी साधायच्या आहेत – उष्णता आणि रुक्षता कमी करणे त्या बीट -कोकम जोडीनेच साध्य होतील.
रक्त कमी असणे किंवा प्लेटलेत घसरणे अशासाठी तर हे उत्तम आहेच, पण Hb व्यवस्थित असूनही निस्तेज त्वचा आणि थकवा असेल तर हे सूप उत्तम काम करते.
तुम्ही बिटाचे मॉडर्न शास्त्रानुसार गुणधर्म पहिले तर त्यात प्रचुर प्रमाणात पोटाशियम, सोडियम जाते जे शरीरातील electrolytes उत्तम ठेवते. शिवाय त्याचे Antioxidant वगैरे गुणधर्म त्याला खास बनवतात.
कितीही उपयोगाचे असले तरी ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हा नियम इथेही लागू पडतो.
कुठल्याही ऋतुत, कुणीही हे सूप घेऊच शकते पण ऑक्टोबर हिट म्हणजे शरद ऋतु आणि वसंताची सुरुवात म्हणजे आताचा ऋतु यात आवर्जून सगळ्यांनी प्यावे असे हे सूप.
कृपया लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारे काळी मिरी, दालचीनी इत्यादीचा वापर यात करू नका.
ऋतु स्पेशल रेसिपी करून बघा आणि फरक अवश्य कळवा.
शुभ उत्तरायण
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
9764995517