काल वैद्यराज प्र. प्र. व्याघ्रसुदन यांनी ऋतुचर्येचा अत्यंत समर्पक असा लेख शेअर केला.
त्यातला ‘अर्थहीन शिक्षणाचा’ मुद्दा अतिशय relatable वाटला , किंबहुना कुठल्याही उत्तम वैदद्याला , जो पथ्य सांगण्याची पराकाष्ठा करत असतो, त्यालाही तो पटेल. ऋतुनुसार फळे खा असे सांगितल्यावर ‘कुठली येतात फळे या ऋतुत?’ इतक्या बेसिक पासून काम करावे लागते. अशा वेळी खरच वाटतं इतकही कसं येत नाही यांना?
कुठल्याही आजाराचे मूळ कारण ‘प्रज्ञापराध’च असते. अगदी जगत्मान्य कारणाच्या म्हणजे ‘इन्फेकशन’ च्या मुळाशी देखील तेच असते.
प्रज्ञापराध – प्रज्ञेचा अपराध! म्हणजे विवेकाचा अभाव !
ज्ञान असूनही त्याकडे दुर्लक्ष करून शरीराला गृहीत धरणे अक्षम्य अपराध आहे. त्याचे परिणाम पदोपदी आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर दिसत असतातच.
कुठलीही गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता लहान मुलांमध्ये स्वभावत:च असते. का? कसे? कुठे? केव्हा? कुणी? या प्रश्नांभोवती त्यांचा ‘विद्या ग्रहण करण्याचा प्रवास’ चालू असतो. प्रश्न पडण्यासाठी, त्यावर सखोल चर्चा करण्यासाठी तुम्ही त्यांच्याभोवती तसे पोषक वातावरण निर्माण करताय का यावर त्यांच्या ‘ज्ञानाची’ खोली अवलंबून राहते.
शिक्षण कशासाठी? उत्तम व्यवसाय, नौकरी यासाठी तर ते आवश्यक आहेच परंतु त्याही पेक्षा जास्त ते ‘जीवनासाठी’ असावे. मी शिकलेल्या गोष्टींचा उपयोग माझे जीवन फक्त आर्थिक – सामाजिक स्तरावर चांगले करण्यासाठी नव्हे तर ‘शरीर – मनाच्या’ स्वास्थ्यासाठी देखील व्हावा आणि त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे – ऋतु आणि त्यांच्या बदलांचा आपल्यावर होणार्या परिणामांचे शिक्षण!
फार पूर्वी गमतीत माझ्या लेकीने विचारले होते ‘ अम्मा if an apple keeps a doctor away, what does keep a Vaidya away?’ तेव्हा अगदी आपसूक आलेले उत्तर होते ‘ऋतुचर्या पालन’!
पुढे अभ्यासक्रम विरहित शिक्षण क्षेत्रात आले आणि ‘केवळ वैद्य’ असल्यामुळेच ‘जीवनाभिमुख शिक्षणाचा’ पाया रचू शकले.
ऋतु, त्यानुसार निसर्गात आणि आपल्या शरीरात होणारे बदल, त्यानुसार आपल्याला करावे लागणारे आहारातले बदल, त्या त्या ऋतुत येणार्या गोष्टीपासून नवनवीन रेसिपीची निर्मिती असा एक मोठा अभ्यासक्रमच सुरू झाला. सगळ्या गोष्टी 20 गुणांभोवती फिरणार्या. फक्त आहाराचे शास्त्र नाही तर कुठेही लागू पडणारी आयुर्वेदातली अनेक शाश्वत सूत्रे मला शिक्षण क्षेत्रात काम करताना प्रकर्षाने अनुभवायला मिळाली आणि या शास्त्राला ‘आयुष: वेद:’ का म्हणतात याची प्रचिती आली.
हे खाऊ नको, ते खाऊ नको , हे सांगण्यापेक्षा त्या मागचे लॉजिक क्लियर करत गेलो आणि मग ते सहजपणे पाळले जाऊ लागले. या ज्ञानाच्या बळावरच करोना काळात एकही दिवस शाळा बंद न ठेवण्याचा विक्रम करू शकलो ( कुणीही आजारी न पडता). यात काहींना स्टंट वाटला तर काहींना अजून काही , पण ऋतुचर्या पालनाचे महत्व मुलांवर बिंबत गेले हा सर्वात मोठा फायदा झाला.
नुकतेच आम्ही उत्तरायण साजरे केले आणि लगेच प्रश्न आला – “ताई आता वसंत सुरू होईल , आपण श्रीखंड करुयात न?” रुक्षता आणि उष्णता दोन्ही उत्तम रित्या कमी करण्यासाठी श्रीखंड किती महत्वाचे आहे हे आता त्यांच्या प्रज्ञेत चांगलेच रुजले आहे. म्हंटलं तर साधिशी गोष्ट पण अगदी खोल रुजत चाललेल्या गोष्टी त्यांना पुढे आयुष्यभर स्वस्थ राहण्यासाठी उपयोगी पडणार्या आहेत.
अद्यायवत तंत्रज्ञान आपल्या जागी महत्वाचे आहेच, ते तुम्हाला emergency मधून नक्कीच वाचवतील पण ऋतुचर्येसारख्या साध्याशा गोष्टी तुम्हाला त्या emergency पर्यन्त जाऊच देणार नाहीत हे नक्की.
कालच मुलांना या ऋतुतील विशेष भाजी ‘आंबटचूका’ बनवायला शिकवले. ‘तृष्णाशामक’ या एका शब्दातच तिचे महत्व अधोरेखित होते. त्यात असलेले potassium आणि त्याचे electrolyte गुणधर्म तर जाणून घेतले तसेच गुणांनी, रसाने होणारे कार्यही जाणून घेतले. बर्याच मुलांनी ही भाजी पहिल्यांदाच खाल्ल्याचे ऐकून खूप आश्चर्य वाटले. प्रत्येक पदार्थाला जसे प्रोटिन, carbohydrates, vitamins minerals अशा बाजू असतात तशाच ‘रस- वीर्य- विपाक – प्रभाव आणि गुण’ अशा बाजू देखील असतात. कुठल्याही पदार्थाचा असा बहुआयामी अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे.
त्या त्या ऋतुत वाढणार्या अथवा कमी होणार्या गोष्टींना balance करणार्या गोष्टी निसर्गात स्वभावत:च येत असतात, पण आपले निरीक्षण करणे राहून जाते की जाणून बुजून दुर्लक्ष करणे होते माहीत नाही.
एकदा एक पेशंट न राहवून म्हंटले होते ‘आम्ही इतक्या पथ्याने राहू लागलो तर तुम्हाला पेशंटच उरणार नाहीत” .
खरे तर याचे उत्तर मी बर्याच सविस्तरपणे देऊ शकले असते, पण मी इतकेच म्हंटले की कितीही ज्ञान दिले तरी ‘इंद्रियांच्या अधीन असलेल्या मनाद्वारे प्रज्ञापराध होण्याची जोवर शक्यता आहे तोवर वैद्यांना कसली चिंता नाही’.
यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर खरोखर आपल्याला ऋतुबदल, त्यानुसार येणारी फळे, भाज्या आणि त्यानुसार करावे लागणारे बदल जर माहीत नसतील तर आपण काय शिक्षण घेतोय आणि काय उपयोगात आणतोय हे एकदा तपासून बघायला हवे.
वैद्यराज तुम्हाला धन्यवाद, तुम्ही या कारणात शिक्षणाचा उल्लेख केलात आणि मला लिहिते केले. करत असलेल्या कामाचे महत्व मलाच पुन्हा अधोरेखित झाले.
शुभं भवतु