कुठलीही भाषा समृद्ध होण्यासाठी सातत्याने वापरात असावी लागते.लिहून, बोलून, ऐकून भाषा समृद्ध होत असते. आपल्या भाव भावना व्यक्त होण्यासाठी ‘भाषा’ हे महत्वाचे मध्यम आहे.
मी मुळची ‘खानदेशी’! माय मराठीचा एक वेगळाच लहेजा आमच्या खानदेशी भाषेला आहे. पुढे पुण्यात शिक्षणाला आले, आणि एका चीत्पवनाशी लग्न झाले. त्यामुळे शुद्ध पुणेरी भाषा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलीये.
माझ्या रुग्णांचाही मोठा वाटा आहे माझी भाषा समृद्ध होण्यात.वैद्यकीय व्यवसाय करत असल्यामुळे, कोकणी, वऱ्हाडी, सातारी, कोल्हापुरी, सोलापूरी, अशा अनेकविध रुग्णांमुळे माय मराठीचे वैविध्य अनुभवता आले आणि भाषा समृद्ध होत गेली. मावळ भागातील बरेचसे रुग्ण मळमळ या लक्षणाला ‘ डाचतय’ म्हणायचे. अशा वेगवेगळ्या भाषेतील लक्षणांची एक छान यादीच तयार झाली. पुढे पुढे मग रुग्णाच्या भाषेवरून अंदाज घेत मीच ठराविक लक्षणे विचारात असे.
लिपी ‘देवनागरीच’ पण बोलण्याचे नानविध ढंग आणि लय यामुळे किती विविधता आली. वाचण्याच्या अफाट प्रेमामुळे, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, यांच्यामुळे ‘गावाकडची’ खास भाषा अवगत झाली. पु.लंमुळे भाषेच्या ‘कोट्या’ कळल्या ! ना.सं. असोत अथवा बाबासाहेब ऐतिहासिक साहित्याने ‘राजेशाही भारदस्त’ भाषेचा संग्रह झाला.
माझ्या आवडत्या ‘मीना प्रभूंची’ पुस्तके हि फक्त प्रवास वर्णन इतक्या वरवरच्या गोष्टीची नाहीत. तर ‘मराठी भाषेची’ खास अशी देण आहेत. कुठल्याही खंडात फिरताना आणि तिथली भाषा अनुभवताना आपल्या भाषेविषयी नकळत खूप काही बोलून जातात. वेळोवेळी अनेकविध कवींची आणि लेखकांची विविध पदे अशा पद्धतीने मांडतात कि आपण हमखास ते वाचावे.
थोडक्यात आशय व्यक्त करणाऱ्या कविता वाचण्याच्या छंदाने खूप खूप समृद्ध केलं. इंदिरा संत, शांता शेळके, सुरेश भटांच्या गझल, वैभव जोशींचे शब्द वैभव सांर काही अवर्णनीय!
साहित्य-शब्द ऋणानुबंध घट्ट आहेत ! साहित्य शाश्वत आहे. आपल्याला सर्वार्थाने समृद्ध करणारे आहे.
येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना भाषेची गोडी लावणे आणि आपण आपली मायबोली सर्वथा टिकवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे…….!
धन्यवाद
वैद्य ज्योत्स्ना पेठकर