नेहेमीप्रमाणे कुठल्यातरी विषयावर मुलांसोबत एकत्रितपणे चर्चा सुरू होती. बोलता बोलता विषय कपड्यांनावरून मध्यंतरी फर्ग्युसन महाविद्यालयात सारी डे आणि टाई डे च्या दिवशी घडलेल्या घटनेकडे गेला. त्यावर मुलांच्या आलेल्या काही प्रतिक्रिया विचारात पाडणार्या होत्या.
काहींना यात गम्मत वाटली तर काही मुलांना यात काहीही गैर वाटले नाही. म्हणाली काय हरकत आहे मुलांनी साडी नेसली तर? असं कुणी ठरवलं मुलांनी साडी नेसायची नाही? मुलींनी शर्ट पॅंट घालायची नाही? Stereotype ब्रेक करायला काय हरकत आहे?
वय वर्षे 11, stereotype शब्दाचा नेमका अर्थ माहिती नाही, stereotype वाटणार्या गोष्टींची relativity माहिती नाही पण ब्रेक करायला हव्यात असे ठाम ‘बिंबवले गेलेले’ दिसत होते.
लहान मूल आहे बोललं गेलं असेल म्हणून विषय सोडून देण्याचा हा काळ नाही.
उमलत्या वयात आपल्या शरीरात होणार्या बदलांना सामोरे जाताना त्यांना अगणित प्रश्न आणि कुतूहल असणे स्वाभाविक आहे. स्वत:च्या बाह्य रूपाची जागरूकता जरा जास्तच असते आणि त्याच बरोबर क्रेझी आणि so called cool गोष्टींकडचा कलही अधिक असतो. घरातल्या शिस्तीची चौकट जाच करू लागते कारण बाहेरचे भुलवणारे जग खुणावत असते.
न धड शरीर परिपक्व असते न विचार न मन, पण तरीही आत्मविश्वास मात्र दांडगा असतो. आणि त्यातच काहीशा क्रांतिकारी / rebellious वाटणार्या गोष्टींकडे कल वाढू लागण्याची शक्यता असते. त्यात योग्य काय अयोग्य काय याच्या खोलात शिरण्याची त्यांची तयारी नसते.
अशा अडनिडया वयात अर्धवट अवस्थेत त्यांच्यात स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची, ठाम मतं बनवण्याची क्षमता खरच आलेली असते?
नवीन येऊ घातलेल्या child policy मुळे तर हे प्रश्न अधिकच अधोरेखित झाले आहेत.
मुलांना जपले पाहिजे, समजवून घेतले पाहिजे, त्यांच्या कलाने घेतले पाहिजे, वगैरे ठीक आहेच पण त्यांना स्वत:बद्दल वाटत असलेल्या गोष्टी हा त्यांचा संभ्रम आहे की वास्तव याची शहानिशा न करता त्यांना त्यांचे निर्णय घेऊ देणे कितपत योग्य ठरणार आहे?
बाळ जन्माला आल्यानंतर ते मुलगा आहे की मुलगी हे पृथ्वीवर सगळीकडे बाह्य स्वरूपावरून म्हणजेच जननेंद्रियांवरून ठरवले जाते. पुढे जाऊन त्या व्यक्तीची लैंगिकता त्यांच्या निसर्गत: असलेल्या लिंगापेक्षा भिन्न असली तर तशी लक्षणे त्याला आणि इतराना जाणवू लागतात आणि स्त्री पुरुष या दोन्ही पेक्षा भिन्न अशी एक वेगळी ओळख त्या व्यक्ती विशेषाला मिळते.
अगदी आता आता पर्यंत क्वचितच दिसणार्या या व्यक्ती विशेषांची संख्या अचानक वाढताना दिसतेय. केवळ संख्याच नाही तर वैविध्य देखील.
‘ LGBTQIA +’ हे नवीन विश्व अजाणत्या वयातील मुलांवर आदळते आहे. वयात येणारी मुलं आवर्जून या कम्यूनिटी बद्दल प्रश्न विचारू लागली आहेत. त्यांनी शंकेचे निरसन करून घेणे वेगळे आणि आपणही त्याच कम्यूनिटी पैकी एक आहोत असे भासवून घेणे वेगळे.
कुठल्याही मुलाला / मुलीला स्वत:च्या लैंगिकतेबद्दल जे काही वाटतय ते ‘factious’ आहे की ‘fascination’? हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सहजतेने भुलायचे हे वय असते. त्यात या सगळ्या कम्यूनिटीला अतिशय glorify करून attractive पद्धतीने मांडले जातेय. मुलामुलींना यात ‘cool’ factor वाटला नाही तरच नवल. Peer pressure हा factor तर सगळ्याच बाबतीत लागू पडतो. मला चांगलं आठवतं, एक आठ वर्षाचा माझा पेशंट हळूहळू कोमेजत चालला होता. खूप प्रेमाने विश्वासात घेऊन विचारल्यावर ढसाढसा रडत म्हणाला ‘सोसायटीत सगळे मला तू मुलीसारखा आहेस भितरू भागूबाई म्हणून चिडवतात”
त्याला हळूहळू यातून बाहेर काढले आता तो अगदी छान आहे, पण हे समजा असेच चालू राहिले असते तर कदाचित हीच आपली ओळख आहे असे त्याला वाटू लागले असते तर? आणि नवीन येऊ घातलेल्या चाइल्ड पॉलिसी नुसार त्याला त्याच्या गोष्टी ठरवायचा अधिकार त्याने वापरला असता तर काय अनावस्था प्रसंग ओढावला असता.
Signs आणि symptoms यात खूप फरक आहे. जे वाटतय ते खरच आहे का हे पडताळण्याचा अधिकार आधी त्याच्या कुटुंबाचा आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा आहे.
या बाबतीतली पाश्चात्य देशातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. मला वाटतय म्हणून मी कुणाचीही परवानगी न घेता, कुटुंबाशी सल्ला मसलत न करता शाळेतच मिळणार्या हार्मोन्सच्या औषधांनी स्वत:त बदल करून घेऊ शकतो/ शकते ही गोष्ट तिथे बळावत चालली आहे. आणि आता हे हळूहळू आपल्याकडे चाइल्ड पॉलिसीच्या माध्यमातून येऊ घातलय.
अजाणत्या वयात त्यांना नको त्या गोष्टिना exposure देणे योग्य राहील का?
ज्या संकल्पना त्यांना माहिती नाहीत आणि माहिती असण्याची गरजही नाही त्या introduce करून काय साध्य होणार आहे? आपण स्त्री अथवा पुरुष असणे हे निसर्ग अथवा आपली जनुके ठरवतात. ते कुणी आपल्यावर लादत नाही किंबहुना लादू शकत नाहीत.
एखाद्याला आपल्या लैंगिकतेबद्दल असणारे कंसर्न ऐकून घेणे, जाणून घेणे, आणि त्या बद्दल योग्य तो निर्णय घेणे हि खूप गुंतगुंतीची प्रक्रिया आहे. खरोखर अशी केस असणे हे फार दुर्मिळ असणार आहे. यात ‘आभास’, ‘fad’, ‘cool attitude’, ‘rebellious attitude’ किंवा ‘break the stereotype’ असे फॅड देखील असू शकते. या इतक्या शक्यतांमधून नेमके निदान होण्यासाठी योग्य पर्याय फक्त तज्ञ वैद्यकीय क्षेत्रच असू शकतो.
पण या सगळ्या आधी एक विचार होणे गरजेचे आहे की हे सगळे एवढ्यात वाढीस कसे लागले आहे. काळ असा आहे की, आपण ‘अखंड सावध असावे’.
एकुणात या गोष्टी रुजवल्या गेल्या आणि तेही सकारात्मक पद्धतीने तर त्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर होणार आहे. आपली कुटुंब व्यवस्था आपल्या संस्कृतीचा मजबूत कणा आहे. तो खिळखिळा करण्यासाठी पद्धतशीर आखलेला हा एक खूप मोठा डाव आहे.
आपल्या पिढीला आपल्याला यापासून दूर ठेवायला हवे आहे.
कुटुंबात विविध प्रसंगातून अनेक चांगली मूल्य नकळत रुजवली जात असतात. एकत्र बाजाराहाट करणे, भाज्या निवडणे, यासारख्या अगदी क्षुल्लक वाटणार्या गोष्टींपासून सण उत्साहाने साजरा करणे, नातेवाईकांमध्ये नियमित येणे जाणे ठेवणे, लग्न -मुंज, दहावा, तेरावा अशा महत्वाच्या गोष्टींपर्यंत सगळ्याच चालीरिती मुलाना माहिती व्हायला हव्यात, आपण एक मोठ्या समाजाचा एक जवाबदार भाग आहोत याची जाणिव रुजवायला हवी.
मुलांना मित्र मैत्रिणी खूप असतात, पण पालक दोघेच असतात. त्यामुळे त्यांचे पालकच बनून रहा. जिथे प्रेम, अटॅचमेंट तर असतेच पण एक आदरयुक्त भीती देखील असते जी प्रसंगी महत्वाची असते.
स्वातंत्र्याच्या अत्यंत भ्रामक कल्पना मुलांच्या मनात हेतु पुरस्सार रुजवल्या जात आहेत. आपली संस्कृति जवाबदरीचे आणि कृतज्ञतेचे भान देत असते, ते जितके रुजवू तितकी मुलं स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील भेद जाणण्यासाठी सक्षम होतील.
अनेक गोष्टिना मुलाना exposure असणार आहेच ते आपल्याला थांबवता येणार नाही, पण कुठे काय योग्य काय अयोग्य याचे भान शिक्षणातून, घरातून तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत.
मागे एकदा केरळा स्टोरी पिक्चर बद्दल लिहिताना भारताबाहेर घडलेल्या अशाच काही केसेस वाचत असताना जर्मनीची एक सत्य कथा बघण्यात आली. 16 वर्षांची एक किशोरवयीन मुलगी तिकडे दूर देशात घडणाऱ्या घटनांनी प्रेरित होऊन, त्यांच्यावर कसा अन्याय होतोय आणि आपण त्यासाठी लढायला गेलेच पाहिजे या विचारांनी भारावून जाऊन, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता थेट सिरिया गाठते, isis मध्ये सामील होते आणि पुढे दोनच वर्षात एक मूल पदरी घेऊन वाडिलांना मला इथून सोडवा म्हणून संपर्क करते.
पूर्णपणे तिचा बुद्धी भेद करून, या वयात सहज असणाऱ्या क्रांतिकारी भावनांचा फायदा घेत एका गाफील क्षणी तिला स्वत;चे कुटुंब, समाज, चालीरीती, संस्कृति, देश संगळच सोडायला भाग पाडले गेले.
ती यातून सुटली तरी झालेले नुकसान कधीही भरुन येणारे नाही.
अशाच गोष्टींचा फायदा घेत किशोरवयीन आणि त्याही आधीच्या वयातल्या मुलाना identity crises मध्ये अडकवून, त्यांच्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भ्रामक कल्पना रुजवून कुटुंबापासून, समाजापासून, संस्कृतीपासून आणि पर्यायाने राष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे.